11 August 2020

News Flash

सोलापुरात तीनशे व्यक्तींना मायक्रो फायनान्स कंपनीचा गंडा

पिग्मीवर आकर्षक मोबदला देण्याचे आमिष दाखून सोलापुरात सुमारे तीनशे व्यक्तींना ६७ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी शहरातील साखर पेठेत कार्यरत असलेल्या ओडिशा येथील मायक्रो लेझिंग फायनन्स कंपनीच्या

| April 17, 2015 04:00 am

पिग्मीवर आकर्षक मोबदला देण्याचे आमिष दाखून सोलापुरात सुमारे तीनशे व्यक्तींना ६७ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी शहरातील साखर पेठेत कार्यरत असलेल्या ओडिशा येथील मायक्रो लेझिंग फायनन्स कंपनीच्या दिल्लीस्थित अधिकाऱ्यासह नऊ जणांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली असून या सर्वाना गुरुवारी दुपारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता सर्वाना पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.
या संदर्भात काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे (रा. कोनापुरे चाळ, रेल्वे लाइन्स, सोलापूर) यांनी आवाज उठवून पोलिसात फिर्याद नोंदविली. त्या स्वत: फसवणुकीच्या शिकार ठरल्या आहेत. या प्रकरणी कंपनीच्या दिल्लीस्थित अधिकारी ई. पी. ली. त्रिलोचन यांच्यासह संतोष जल्ला, राजू गड्डम, सत्यनारायण दासरी, प्रवीण म्याकल, सचिन क्षीरसागर, अनिल मेंगजी, सूर्यनारायण आचार्य व अतिता दास यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी शाखा व्यवस्थापक त्रिलोचन यांच्यासह कर्मचारी संतोष जल्ला, सत्यनारायण दासरी, राजू गड्डम आदी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
दरमहा एक हजार रुपये गुंतवा आणि तीन वर्षांत ४२ हजारांची रक्कम मिळवा, असे आमिष दाखवून मायक्रो लेझिंग फायनान्स कंपनीच्या सोलापुरातील शाखेचे कर्मचारी सामान्य मध्यमवर्गीय व कष्टकरी वर्गाकडून पिग्मी गोळा करीत होते. गेल्या १२ वर्षांपासून म्हणजे २००३ पासून हा व्यवहार सुरू होता. यात रेल्वे लाइन्स, फॉरेस्ट भागातील मोलमजुरी करणाऱ्या महिलांनीही आकर्षित होऊन गुंतवणूक केली होती. ओडिशातील या कंपनीची देशभरात ठिकठिकाणी कार्यालये आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये सीबीआयने या कंपनीविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. रिझव्र्ह बँकेनेही या कंपनीचे आर्थिक व्यवहार गोठविले होते. तरीही सोलापुरात कंपनीच्या कार्यालयामार्फत पिग्मी जमा केली जात होती. अखेर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे आढळून येताच गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली. फसवणुकीची रक्कम ६७ लाख ५८ हजार १०९ रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2015 4:00 am

Web Title: microfinance company cheated three hundred people in solapur
टॅग Solapur
Next Stories
1 प्रदीप रासकर यांच्या बदलीची शक्यता
2 जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार रखडले
3 तरुणीचा गर्भपात करून खुनाचा प्रयत्न
Just Now!
X