औरंगाबाद महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेना-भाजपची सत्ता येणार हे स्पष्ट झाले असले, तरी या निवडणुकीत एमआयएमने मारलेल्या जोरदार मुसंडीकडे राजकीय विश्लेषकांसह सामान्य औरंगाबादकरांचेही लक्ष वेधले गेले आहे. मुस्लिम आणि दलित या दोन समाजघटकांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणाऱया एमआयएमला औरंगाबाद महापालिका निवडणुकीत २५ जागांवर यश मिळाले आहे. यामुळे हा पक्ष महापालिकेमध्ये प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप सत्ता राखणार का, या मुद्द्याइतकेच एमआयएम किती जागा जिंकणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. ५४ वॉर्डांमध्ये एमआयएमने आपले उमेदवार उभे केले होते. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काही दिवस औरंगाबादमध्ये ठाण मांडले होते. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही औरंगाबादमधूनच एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर एमआयएमने लक्षवेधक कामगिरी केल्याचे दिसते आहे.
मुस्लिमांबरोबर दलित वर्गानेही एमआयएमच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. एमआयएमने एकूण १३ दलित उमेदवारांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी पाच उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्याचबरोबर औरंगाबादमधील मुस्लिमबहुल भागामध्ये एमआयएमला चांगले यश मिळाले असल्याचे दिसते आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी एमआयएमने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला नव्हता. तरीही नागरिकांनी त्यांच्या पारड्यात आपले मत टाकले असल्याचे दिसते आहे.