महाविकासआघाडी सरकारने सुरू केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात एका नव्या मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. ‘ट्रान्सफर मंत्रालय’ असे त्याचे नाव आहे. त्याचे मंत्री कोणी एक दोन नाही तर अनेक आहेत’ अशा शब्दात ट्विट करून आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकार आल्यापासून भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील  सातत्याने राज्य सरकारवर टीका करत आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. या माध्यमातून महाविकासआघाडी सरकारमधील काही मंत्री मलिदा लाटत असल्याचाही आरोप केला जात आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात यावरून कलगीतुरा सुरू आहे. पाटील यांनी मुश्रीफ यांना उद्देशून ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को’ असा टोला लगावला होता. नेत्यांना निष्ठा दाखवण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. त्यातून ते टीका करत आहेत, असे पाटील यांनी म्हटले होते. तर त्याच्या पुढे जात आज त्यांनी महाराष्ट्रात ट्रान्सफर मंत्रालय स्थापन झाल्याची टीका करून या ‘मंत्रालयाचे बजेट नाही… टार्गेट असतं’ असे म्हणत एका अर्थाने अर्थपूर्ण व्यवहारावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे.