गेल्या काही दिवसांपासून मीरा-भाईंदर शहरात मच्छरांचा अतिरेक  वाढला आहे. त्यामुळे इतर आजारांची लागण होऊन त्याचा गंभीर परिणाम आरोग्यावर होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडून दर महिन्याला शहरातील सर्व भागात औषध फवारणीचे काम करण्यात येते. याकरिता वर्षांला कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येतात.

मात्र ही औषधे फवारणी योग्य पद्धतीने होत नसून केवळ दिखाव्यापूर्ती ही कारवाई करण्यात येत असल्याचे आरोप सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील अधिकतर भागात मोठय़ा प्रमाणात डासांचा वावर वाढलेला दिसून येत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सध्या शहरात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवण्यात येत असल्यामुळे शहरातील स्वच्छतेकडे लक्ष देण्यात येत आहे. तसेच, प्रत्येक विभागात औषध फवारणीचे काम नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात येत आहे.

मात्र डासांचा अतिरेक वाढल्यामुळे डेंगू, मलेरियासारखे आजार होण्याची शक्यता वाढली आहे. करोनासारख्या परिस्थितीत या सर्व आजारांची लक्षणे सारखी असल्यामुळे पालिका प्रशासनाने यांवर गंभीर लक्ष देऊन समस्या दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सर्व प्रभागात औषध फवारणीचे काम करण्यात येत आहे. तसेच ज्या भागात  अधिक तक्रार  असेल त्या भागात अधिक लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

– संभाजी वाघमारे, उपायुक्त (आरोग्य विभाग)