पावसाने निराशा केल्यामुळे दुष्काळाचे संकट डोक्यावर कायम राहिलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न शासनाने हाती घेतला आहे. त्यासाठी ढगाळ वातावरणात चाचणी घेण्याकरिता चार विमाने सोलापुरात दाखल झाली आहेत. कृत्रिम पावसासाठी वातावरणाची अनुकूलता आहे की नाही, याची पहिल्यांदा चाचणी केली जात आहे. मंगळवारी दुपारनंतर विमानांनी आकाशात उड्डाण घेऊन ही चाचणी सुरू केली. हवामानाची चाचणी करून त्यात अनुकूलता आढळून आल्यानंतरच कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुण्यातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजीची (आयआयटीएम) दोन विमाने आणि कर्नाटक शासनाची दोन विमाने अशी चार विमाने सोलापुरात दाखल झाली आहेत. आकाशात ढगाळ वातावरण पाहून ही विमाने आकाशात उड्डाण करून घिरटय़ा घालत होती.

सोलापुरात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने संशोधन करण्यासाठी गेल्या वर्षी सोलापूरजवळ सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात सिंहगड इन्स्टिटय़ूट व पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून दोन रडार बसविण्यात आले होते. त्यानंतर २३ जुलै २०१८ पासून प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला होता. नंतर २०० तास संशोधन झाले होते. यंदाच्या वर्षी पावसाने पुन्हा निराशा केल्यामुळे कृत्रिम पावसासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे.

सोलापुरातील २०० किलोमीटर परिसरात ही विमाने घिरटय़ा घालून कृत्रिम पावसासाठी वातावरण अनुकूल आहे किंवा कसे, याचा अभ्यास केला जात आहे. वातावरण अनुकूल असल्याचे दिसून आल्यास कृत्रिम पाऊस पाडायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

सकाळी सोलापूरच्या विमानतळावर चारही विमाने उड्डाणासाठी सज्ज झाली होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे विमानांनी  उड्डाण केले नव्हते. मात्र दुपारनंतर विमानांनी उड्डाण करून घिरटय़ा घातल्या.