सरासरीच्या ५८ टक्केच विखुरलेला पाऊस ; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट, १२ टक्केच पेरण्या
पश्चिम विदर्भात मान्सून सक्रीय झाला असला, तरी आतापर्यंतच्या सरासरीच्या तुलनेत केवळ ५८ टक्केच पावसाची नोंद झाली असून तोही विखुरलेल्या स्वरूपात असल्याने पेरण्यांना गती मिळालेली नाही. गेल्या २४ तासात पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये केवळ २.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ४.२ मि.मी. पाऊस वाशीम जिल्ह्यात झाला. या विभागात आतापर्यंत १२ टक्केच क्षेत्रात पेरणी झाली आहे.
अमरावती विभागात आतापर्यंत ७८.३ मि.मी. म्हणजे २६ जूनपर्यंतच्या सरासरीनुसार ५८.६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत १४४ मि.मी. म्हणजे, १०८ टक्के पाऊस झाला होता. यंदा मान्सून उशिरा सक्रीय झाला, पण त्याचवेळी तो विखुरलेल्या स्वरूपात आहे, सार्वत्रिक नसल्यामुळेच शेतकऱ्यांना अत्यंत सावधगिरीने पेरण्यांना सुरुवात करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बुलढाणा व अमरावती जिल्ह्यातील वरूड, अंजनगाव सुर्जी तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला, पण इतर भागांमध्ये तुरळक सरी कोसळल्या. अजूनही विभागात पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पावसाची उत्तरसीमा कायम असून येत्या दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल उत्तर अरबी समुद्राचा काही भाग, गुजरात, पश्चिम मध्यप्रदेश आणि आग्नेय राजस्थानात दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे. मात्र, पश्चिम विदर्भात सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही. जूनच्या अखेपर्यंत विभागात मूग आणि उडदाचा पेरा आटोपण्याच्या बेतात असतो, पण अजूनही समाधानकारक पावसाअभावी या पिकांच्या पेऱ्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अमरावती विभागात १२ टक्के म्हणजे ३ लाख ८१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. यंदा यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३ लाख १७ हजार हेक्टर, तर बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात केवळ २ टक्केच क्षेत्र पेरणीखाली आले आहे. अकोला आणि वाशीम जिल्ह्यातही पेरणी झालेले क्षेत्र नगण्य आहे. विभागातील लागवडीखालील सरासरी ३२ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ८ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात आहे. आतापर्यंत तेथे ३५ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात १४ हजार हेक्टर, अकोला १२ हजार हेक्टर, वाशीम २२ हजार हेक्टर, तर अमरावती जिल्ह्यात १४ हजार हेक्टरात पेरण्या आटोपल्या आहेत. सर्वाधिक पेरा कपाशीचा असून यंदाच्या खरिपात १० लाख ८७ हजार हेक्टरात कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. त्यापैकी आतापर्यंत २ लाख ५५ हजार हेक्टरात कापूस लागवड झाली आहे. या विभागात १२ लाख ६८ हजार हेक्टरात सोयाबीनची लागवड होण्याचा अंदाज आहे.
आतापर्यंत ७७ हजार हेक्टरात सोयाबीनचा पेरा झाला आहे. साधारण १५ जुलैपर्यंत मूग आणि उडदाचा पेरा होणे आवश्यक आहे. सध्या विभागात समाधानकारक पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असा सल्ला मंत्र्यांपासून ते कृषी सल्लागारांपर्यंत अनेकांनी दिला आहे.