सावंतवाडी: आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या विजयदुर्ग किल्लय़ावर आजही मोठय़ा प्रमाणात ऐतिहासिक वास्तू चांगल्या स्थितीत आहेत. त्या सर्वांचे संवर्धन करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर काम सुरु करणे गरजेचे आहे. असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी व्यक्त केले.
केंद्रीयमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याशी याविषयी चर्चा झाली असून, संवर्धनाचा आराखडा तयार करुन कामाला सुरुवात करण्यात येईल, असे ते म्हणाले.
ऐतिहासिक किल्लय़ांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. फक्त पत्रे देऊन किल्लय़ांचे जतन होणार नाही. त्यासाठी शासन आणि पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे. रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर अन्य किल्लय़ांचेही प्राधिकरणामार्फत संवर्धन होण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
या दौऱ्यात त्यांनी संपूर्ण विजयदुर्ग किल्लय़ाची, तटबंदीची, कोसळलेल्या भागाची पाहणी करून ऐतिहासिक तलाव, भवानीमाता मंदिर, राजमहाल, कोठार, गोडय़ा पाण्याची विहीर, जीबीचा दरवाजा या ठिकाणांची पाहाणी केली. किल्लय़ांचे संवर्धन करणे त्यांचे जतन करणे काळाची गरज आहे. यात कोणीही राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
या दौऱ्यात विजयदुर्ग ग्रामपंचायत, गाबित समाज यांच्या वतीने खासदार संभाजी राजे यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. विजयदुर्ग किल्लय़ाचे जतन व संवर्धन करताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊ न काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 10, 2020 2:46 am