राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खरमरीत शब्दांत टीका केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे कॉपी कॅट आहेत. त्यांच्याकडे स्वत:च्या काही कल्पना नाहीत. दिल्लीत पंतप्रधान मोदी काय करतात, ते पाहून त्यांची इकडे कॉपी करतात, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे त्या म्हणाल्या.
एका कार्यक्रमानिमित्त नाशिक येथे आल्यानंतर माध्यमांबरोबर बोलताना त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरही भाष्य केले. मुख्यमंत्री ज्या मतदारसंघातून निवडून येतात. तेथे सरकारी विश्रामगृहात बलात्कारासारखे प्रकार होतात. हे अत्यंत निंदनीय असून राज्यासाठी ही अत्यंत वाईट गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात अशाप्रकारच्या घटना यापूर्वी कधीच घडल्या नव्हत्या. त्या आता घडत आहेत, असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्र्यांकडे स्वत:चे असे अस्सल काही नाही. त्यामुळे त्यांना पंतप्रधानांवर अवलंबून राहावे लागते. पंतप्रधान मन की बात हा कार्यक्रम करतात म्हणून यांनीही लगेच तशाच प्रकारचा शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम घेतला. स्वत: अस्सल ते काहीच करत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधात असताना वेगळी भूमिका घेणाऱ्या भाजपची सत्तेवर आल्यानंतर दोन वर्षांतच भूमिका बदलली आहे. वर्षभरात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असून ही दुर्दैवी बाब आहे. या परिस्थितीतही भाजप सरकार कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप, त्यांनी केला. नागपूर-मुंबई महामार्गास शेतकरी विरोध करत आहे. विकासाला राष्ट्रवादीचा विरोध नाही. पण जनतेचा त्या प्रकल्पाला विरोध असल्यास सरकारने त्यावर विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. यापूर्वीही सुप्रिया सुळे यांनी वारंवार मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली होती.