विदर्भात सध्या मुसळधार पाऊस सुरु असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर शहरात जोरदार पाऊस सुरु असून त्यामुळे अनेक भागात गुडघाभर पाणी साचले आहे. रस्यांवर वाहने तरंगताना दिसत आहेत. पुढील ४८ तासांत शहर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे विधान भवन भागातील पॉवर स्टेशनमध्ये पाणी भरले आहे. त्यामुळे विधानभवनाची वीजही गायब झाली आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनही आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने अलर्ट जारी केला असून गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असा इशारा सर्वसामान्यांना देण्यात आला आहे. नागपूर शहरातील पावसाचा परिणाम आजूबाजूच्या भागातही जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईतही मुसळधार पाऊस झाला होता. यामध्ये मोठे नुकसान झाले होते.

हवामान विभागाने आजपासून ९ जुलैपर्यंत ज्या राज्यांसाठी मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यामध्ये राज्याचाही समावेश आहे. या भागांमध्ये पुढील ४८ तास मुसधार पावसाची शक्यता असून या काळात मोठे वादळाची स्थितीही निर्माण होऊ शकते. त्यासाठी एनडीआरएफच्या ८९ तुकड्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.