नागपूरमध्ये कमलेश पवनकर कुटुंबाची हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक पालटकर याला अखेर गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली आहे. विवेकला पंजाबमधील लुधियाना येथून अटक करण्यात आली असून पोलिसांचे पथक विवेकला अटक करुन नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहे.

नागपूरमध्ये ११ जूनला विवेक पालटकरने स्वत:च्या मुलासह बहीण, मेव्हणा, सासू, भाची अशा पाच जणांची निर्घृण हत्या केली होती. कमलाकर मोतीराम पवनकर (५३), अर्चना कमलाकर पवनकर (४५), वेदांती कमलाकर पवनकर (१२), मीराबाई मोतीराम पवनकर (७५) आणि कृष्णा विवेक पालटकर (५) अशी या मृतांची नावे होती. खरबी रोड येथील आराधनानगर येथे ही घटना घडली होती. कमलाकर पवनकर हे भाजपाचे कार्यकर्ते होते. हत्येनंतर आरोपी विवेक पालटकर पसार झाला होता.

गुरुवारी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने विवेकला पंजाबमधील लुधियाना येथून अटक केली. विवेक हा लुधियानातील झोपडपट्टी परिसरात लपून बसला होता. गेले तीन दिवस गुन्हे शाखेचे एक पथक लुधियानात विवेकचा शोध घेत होते. अखेर पोलिसांना विवेकला अटक करण्यात यश आले आहे.

हत्येचे गूढ अखेर उकलणार

सुरुवातीला हे हत्याकांड पैशाच्या वादातून घडल्याचा संशय होता. हत्येच्या तीन दिवसांनी पोलीस विवेक राहत असलेल्या घरात पोहोचले होते. विवेकच्या घरातून जादूटोण्याचे साहित्य सापडले होते. त्यामुळे जादूटोण्यातून ही हत्या झाल्याचा संशय देखील व्यक्त होत होता. आता विवेकला अटक झाल्याने त्याने पाच जणांची हत्या का केली, याचे गूढ उकलणार आहे.