नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये हाती घेतलेल्या शहरातील नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवन प्रकल्पांचे काम पावसाळ्याआधीच पूर्ण झाले आहे. मुंढे यांनीच यासंदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली आहे. मुंढे यांच्या या कामगिरीचे महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही कौतुक केलं आहे. मुंढे यांच्या ट्विटला कोट करुन रिट्विट करताना आदित्य यांनी नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही बांधील होतो आणि आम्ही ते करुन दाखवलं असं म्हटलं आहे.

मुंढेनी ट्विटवरुन काय माहिती दिली?

“नागपूरची जीवनरेखा आणि शहराची सांस्कृतिक परंपरा म्हणून ओखळल्या जाणाऱ्या नाग नदीचे पुनरुज्जीवन करण्यात आलं आहे. नद्या शहरातील चैतन्य आणि उत्साह जागा ठेवण्याचं काम करतात. नागपूर महानगरपालिकेने खोलीकरण, साफसफाई आणि डी-सिल्टिंग करून शहरातील नद्यांचे पुनरुज्जीवन केले आहे. या नद्यांचे जतन, संरक्षण आणि मजबुतीकरण करणे आपले काम आहे,” असं ट्विट मुंढे यांनी केलं आहे. या ट्विटबरोबरच त्यांनी या प्रकल्पाची माहिती देणारा एक छोटा व्हिडिओही पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत काय म्हणाले आहेत मुंढे?

नागपूर शहराची संस्कृती नाग नदीशी जोडलेली आहे. मात्र मागील काही वर्षांमध्ये या नदीचे नाल्यामध्ये रुपांतर झाल्याचे पहायला मिळालं आहे. नागपूरमधील पिवळी नदी आणि पोरा नदीचीही हीच परिस्थिती आहे. त्यामुळेच आम्ही विचार केला की नागपूर शहर ज्या नदीवर वसले आहे ती नदी स्वच्छ केली पाहिजे. त्यामुळेच या वर्षी आम्ही नागपूरमध्ये केवळ नाग नदीची स्वच्छता मोहीम हाती घेतली नाही तर तिचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. मार्चमध्ये आम्ही काम सुरु केलं आणि आज या तिन्ही नद्या नागपूरकरांना पुर्वीसारख्याच स्वच्छ स्वरुपात भेट म्हणून देण्यात येत आहेत. या नदीमध्ये मोठ्याप्रमाणात घनकचरा, द्रव्य आणि प्राण्यांची संख्या होती हे दिसून आलं. दरवर्षी केवळ गाळ काढून या नदीच्या किनारी ठेवला जायचा. मग पावसाळ्यामध्ये तोच गाळ पुन्हा नदीत जायचा. आम्ही या वर्षी नदीपात्रातून काढलेला गाळ आणि कचऱ्याची शहरातील इतर भागांमध्ये विल्हेवाट लावली. यामुळे दोन फायदे झाले. नदी पूर्णपणे स्वच्छ होऊन आधीसारखी दिसू लागली आणि दुसरी महत्वाची गोष्टी म्हणजे नदीचे पुनरूज्जीवन झालं आहे. तसेच या नदीमधील गाळ शहरातील सखल भागामध्ये टाकल्याने तिथेही पाणी साचण्याची शक्यता कमी झाली आहे. महानगरपालिकेने अवघ्या दोन महिन्यांमध्ये इतर संस्थाच्या मदतीने हे काम करुन दाखवलं आहे,” असं मुंढे यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणतात…

मुंढेंनी आपल्या ट्विटमध्ये राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना म्हणजेच आदित्य ठाकरेंना टॅग केलं आहे. आदित्य यांनाही मुंढेंचे ट्विट रिट्विट करत या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. “आम्ही नाग नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वचनबद्ध आहोत. या कायाकल्पला या वर्षाच्या सुरूवातीला पाठिंबा देत पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने मान्यता दिली होती,” असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लॉकडाउनच्या काळात केली सफाई

मुंढे यांनी लॉकडाउनचा फायदा घेत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नागपूर शहरातील नदी स्वच्छता अभियानाचा श्री गणेशा केला आहे. सामान्यपणे मे महिन्यात नागपूरमधील प्रमुख तीन नद्या स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली जाते. मात्र यंदा ही मोहिम मार्च महिन्यातच सुरु करण्यात आली. २८ मार्च रोजी पंचशील चौकात नागनदीमधून गाळ बाहेर काढत या मोहिमेला सुरुवात झाली. शहरातून जाणाऱ्या तीनही प्रमुख नद्यांची स्वच्छता करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. यासाठी लागणारी सर्व यंत्रसामुग्रीची सोयही आयुक्तांनी करुन दिली.

अशा साफ केल्या नद्या…

नागपूर शहरामधून नाग नदी, पिवळी नदी आणि पोरा नदी जाते. या तिन्ही नद्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. नाग नदी शहरामधून एकूण १७ किलोमीटरचा प्रवास करते. या १७ किलोमीटरच्या अंतराची पाच टप्प्यांमध्ये स्वच्छता करण्यात आली. पिवळी नदीची चार टप्प्यांमध्ये तर पोरा नदीची तीन टप्प्यांमध्ये स्वच्छता करण्यात आली. विशेष म्हणजे या साफसफाईच्या कामाची जबाबदारी एकाच अधिकाऱ्यावर देण्यात आली नव्हती. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळेच जलदगतीने काम करणे शक्य झालं. नागपूर शहरामध्ये एकूण ४८ किलोमीटर लांबीच्या नद्या आहेत. नदीचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नदी पात्रामधून घाण, कचरा आणि गाळ कढण्यात आला आहे. काढलेला गाळ आणि कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्याच्या सूचना देताना हा गाळ नदीच्या बाजूला पडून राहणार नाही यासंदर्भात काळजी घेण्यास मुंढे यांनी आधीच सांगितलं होतं.

दरवर्षी, पावसाळ्याच्या काही दिवस आधी घाईघाईत नद्या साफ केल्या जायच्या. त्यानंतर काढलेला गाळ दुसऱ्या जागी हलवण्याआधीच पाऊस यायचा आणि गाळ पुन्हा नदीत जायचा. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्यास नदीकाठच्या परिसरामध्ये पाणी साचायचे. याच गोष्टी टाळण्यासाठी मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने यंदा पावसाळ्या आधीच नद्या साफ केल्या आहेत.