03 March 2021

News Flash

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक : सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीला खतपाणी

राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नंदुरबारमध्ये अयशस्वी झाला.

नीलेश पवार, लोकसत्ता

नंदुरबार : सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या नंदुरबारमध्ये बडय़ा राजकीय नेत्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना रिंगणात उतरविल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घराणेशाहीला खतपाणी मिळाले आहे. वारसदारांना विजयी करण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामुळे कोणताही धोका न पत्करता सुरक्षित जागा आणि सोईनुसार पक्षाचे तिकीट घेण्याचे मनसुबे संबंधितांनी आखल्याचे चित्र आहे.

‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी सर्व पक्षांनी ताकद लावली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नंदुरबारमध्ये अयशस्वी झाला. दुसरीकडे भाजप संपूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. निवडणुकीचे वैशिष्टय़े म्हणजे सर्वपक्षीय मोठय़ा नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात आहे. तीन पक्षांच्या सरकारमध्ये मंत्रिपद लाभलेले अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता या तोरणमाळ गटातून जिल्हा परिषदेत नशीब अजमावत आहेत. अ‍ॅड. पाडवी यांच्याकडे जिल्ह्य़ातील काँग्रेसची धुरा आहे. त्यांची पत्नी निवडणूक रिंगणात असल्याने या लढतीकडे सर्वाचे लक्ष आहे. त्यांच्यासमोर शिवसेनेचे धडगाव तालुकाप्रमुख गणेश पराडके उभे असल्याने ही लढत अधिक रंगतदार मानली जात आहे. तर काँग्रेसमधून विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये डेरेदाखल झालेले दीपक पाटील यांची पत्नी जयश्री पाटील या लोणखेडा गटातून रिंगणात आहेत. भाजपचे शहादा नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचा मुलगा अभिजीत पाटील काँग्रेसकडून म्हसावद गटात डॉ. भगवान पाटील यांच्या विरोधात मैदानात आहे.

काँग्रेसचे माजी मंत्री अ‍ॅड. पद्माकर वळवी यांची कन्या सीमा वळवी यादेखील या निवडणुकीतून राजकारणात प्रवेश करत आहे. त्या अमोणी गटातून उमेदवार आहेत. या ठिकाणी भाजप आणि सेनेची कडवी झुंज असणार आहे. अक्राणी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांचा मुलगाही नशीब अजमावत आहे. माजी आमदार दिलवरसिंग पाडवी यांचा मुलगा आणि भाजपचे नेते नागेश हे गंगापूर गटातून भाजपचे उमेदवार आहेत.

नवापूर तालुक्यातही मोठय़ा राजकारण्यांचे कुटुंबीय निवडणुकीपासून दूर राहू शकले नाहीत. माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित पुन्हा जिल्हा परिषदेत आपले नशीब अजमावत आहेत. माजी मंत्री सुरुपसिंग नाईक आणि आमदार शिरीष नाईक यांचे बंधू मधुकर नाईक हेदेखील रिंगणात आहेत. घराणेशाहीच्या झटक्यातून नंदुरबार तालुक्याची सुटका झालेली नाही. शिवसेनेत दाखल झालेले माजी आमदार चंद्रकात रघुवंशी यांचे पुत्र राम हेदेखील राजकारणात प्रवेश करत आहेत. ते कोपर्ली गटातून रिंगणात असून त्यांच्या विरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र गिरासे उभे आहेत. भाजपचे जिल्ह्य़ातील नेते आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या पत्नी आणि भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या मातोश्री कुमोदिनी गावित या कोठली गटातून पुन्हा रिंगणात आहेत. राष्ट्रवादीची जिल्ह्य़ाची धुरा सांभाळणारे शरद गावित यांची कन्या अर्चना गावित या थेट भाजपकडून नांदर्खे गटातून निवडणूक लढवीत आहेत.

प्रामाणिक पदाधिकारी, कार्यकर्ते बाजूलाच

जिल्ह्य़ातील सर्व राजकीय नेत्यांचे कुटुंबीय निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात चुरस निर्माण करून नेत्यांना त्यांच्या गट, गणात अडकवून ठेवण्याचे तंत्र सर्वानी अवलंबले आहे. निवडणुकीनंतर नेते वारसदारांसाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांवर दावे करणार असतील तर इतरांनी राजकारण करण्याचा उपयोग काय, असाही प्रश्न अन्य उमेदवार उपस्थित करतात. जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपात घराणेशाहीचा वरचष्मा राहिल्याने पक्षाचे प्रामाणिक काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते बाजूला फेकले गेले आहेत.

पक्षीय बलाबल

काँग्रेस २९

राष्ट्रवादी       २४

भाजप १

अपक्ष   १

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 4:29 am

Web Title: nandurbar zilla parishad election all parties in pursuing hereditary politics zws 70
Next Stories
1 भाजपपुढे सत्ता राखण्याचे आव्हान
2 मोदींच्या योजनांना विरोध केल्यास राज्य सरकार उलथवून टाकू
3 सोलापुरात कांद्याचा दर गडगडला
Just Now!
X