नक्षलवाद्यांचे पत्रकाद्वारे आवाहन

केंद्र व राज्यातील भाजप सरकार जातीयवादी असून मोदी-रमणसिंह-फडणवीस सरकारच्या जातीय धोरणाचा विरोध करा, असे आवाहन करणारी पत्रके व फलक  नक्षलवाद्यांची क्रांतिकारी आदिवासी महिला संघटना, दंडकारण्य या संघटनेने जिल्हाभर लावली आहेत. महिलांनाही त्यांच्यावरील अत्याचाराच्या विरोधात संघटित होण्याचे आवाहन त्यात करण्यात आले आहे.

कुरखेडा तालुक्यातील अंतरगाव-पुराडा रस्त्यावर नक्षलवाद्यांनी पत्रके फेकली व कापडी फलक  लावले. पत्रक व फलकावर राज्य सरकार जातीयवादी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना संघटित होण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे.  मोदी-रमणसिंह-फडणवीस सरकारच्या सांप्रदायिक नीतीचा विरोध करा, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाभरात ही पत्रके वाटण्यात आली आहेत. अतिदुर्गम भागात ठिकठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेले आहेत.