News Flash

तुकाराम मुंढेंवर गंभीर आरोप, राष्ट्रीय महिला आयोगाने पाठवली नोटीस

तुकाराम मुंढे यांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली आहे. स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कंपनी सेक्रेटरी असलेल्या महिलेने मॅटर्निटी बेनिफिट नाकारल्याबद्दल आणि मानसिक छळ तसेच अपमानास्पद वागणुकीची तक्रार राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. या वागण्यावर आक्षेप घेत तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. सात दिवसात योग्य तो अहवाल सादर करावा असंही म्हटलं आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे नागपूर ‘स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या सीईओपदाचाही कार्यभार आहे. स्मार्ट सिटीतील महिला अधिकाऱ्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अपमानजनक वागणुकीची तक्रार दहा दिवसांपूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली होती. आयुक्त तुकाराम मुंढे हे नेहमी इतर अधिकाऱ्यांपुढे अपमान करतात, प्रत्येक स्त्री कर्मचाऱ्याचा अधिकार असलेली प्रसूती रजा व लाभही मला नाकारण्यात आला असं त्यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं होतं. ज्यानंतर आता राष्ट्रीय महिला आयोगाने तुकाराम मुंढे यांना नोटीस बजावली आहे व उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच नागपूर महापालिका क्षेत्रातील लॉकडाउनच्या अमलबजावणीवरुन आयुक्त तुकाराम मुंढे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये वाद झाला होता. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. हा वाद अत्यंत विकोपालाही गेला होता. ज्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचं सीईओपद बळकावल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. “नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सीईओ तुकाराम मुंढे यांचे वर्तन हे अवैध आणि घोटाळेबाज आहे. हे सीईओपदही त्यांनी बळकावलं आहे” या आशयाचा मजकूर या पत्रात होता. आता तुकाराम मुंढे यांच्यावर नवा आरोप झाला असून त्यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. या नोटिशीला तुकाराम मुंढे यांनी सात दिवसात उत्तर द्यावं असंही राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 10:59 pm

Web Title: national women commission send notice to tukaram mundhe scj 81
Next Stories
1 सेनेचे ‘ते’ पाच नगरसेवक परत पाठवा, अजित पवारांना मुख्यमंत्र्यांनी निरोप दिल्याची सूत्रांची माहिती
2 ‘पीपीई किट’ घालून आलेल्या चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडून, ६० तोळे दागिने पळवले
3 ‘या’ जिल्ह्यामध्ये १५ दिवसांची कडक टाळेबंदी
Just Now!
X