आकांक्षा ट्रस्टच्या माध्यमातून उद्या रायगड जिल्ह्य़ातील रोहा येथे पाच हजार विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप केले जाणार आहे, मात्र ही संस्था कोणाची आहे, या संस्थेत निधी कुठून आला आहे, याची केंद्र सरकारने चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री गीते यांनी आपल्या पदाचा गरवापर करून कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी स्वत:शी निगडित संस्थांमध्ये वळवल्याचा दावा त्यांनी केला. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

केंद्रीय मंत्री अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या संकल्पनेतून आकांक्षा ट्रस्टच्या माध्यमातून  ५००० विद्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप करण्यात येणार आहे. हा टॅब वाटपाचा कार्यक्रम रोहा येथे उद्या (दि.१३) होणार आहे. या कार्यक्रमास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या पाश्र्वभूमीवर नबाब मलिक यांनी हा आरोप केला.

मुंबईतील टॅब वितरणातील गरप्रकारांचे दाखले देताना आता मुंबईत असाच गरप्रकार झाला असण्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. आकांक्षा ट्रस्टने टॅबसाठी आलेला निधी आणला कुठून यांची चौकशी होणे गरजेचे आहे. शासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद केले आहे. हा कार्यक्रम पक्षाचा असेल तर शासकीय अधिकारी तिथे कसे उपस्थित राहू शकतात. अशा अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई व्हायला हवी, असे मलिक म्हणाले.

आकांक्षा ट्रस्टने एवढा निधी आणला कुठून, जर या संस्थेला सरकारने अनुदान दिले असेल तर ते एकाच संस्थेला एवढा निधी का दिला, याची चौकशी केंद्र सरकारने सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत. केंद्र सरकारने जर चौकशी केली नाही तर आम्ही न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती मलिक यांनी या वेळी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश धुमाळ, अ‍ॅड. जनार्दन पाटील, मनोज धुमाळ, राजा केणी, ऋषिकांत भगत, संजय तटकरे, संतोष निगडे, मानसी चेऊलकर आदी या वेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या आरोपांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही – अनंत गीते

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही. ज्यांचे आयुष्य भ्रष्टाचार करण्यात गेले ते आज दुसऱ्यावर बोट उठवत आहेत. समाजात कोणी चांगले काम करू शकते यावर त्यांचा विश्वासच राहिलेला नाही. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी स्पष्ट केले. तटकरे यांच्या रोह्य़ात हा कार्यक्रम होत असल्याने त्यांची झोप उडाली आहे. त्यामुळे मलिक यांना पुढे करून असे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे गीते यांनी सांगितले.