News Flash

अबुजमाड जंगलातील नक्षलवाद्यांचे शिबीर उद्ध्वस्त

पोलिसांनी पकडलेले नक्षलवाद्यांचे घोडे धोडराज व नेलगुंडा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलेले आहे.

नक्षलवाद्यांचे शिबीर.

तीन बंदुका, सहा घोडे ताब्यात

नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अबुजमाड जंगल परिसरातील तुंडेवारा व कुपनार येथे पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तेथील नक्षलवाद्यांचे शिबीर उद्ध्वस्त करण्यात पोलिस दलाला यश आले आहे. यावेळी पोलिसांनी नक्षलवादी अबुजमाड पहाड चढण्यासाठी उपयोगात आणत असलेले सहा घोडे व तीन भरमार बंदुका जप्त केल्या. गडचिरोलीच्या नक्षल इतिहासात प्रथमच नक्षलवाद्यांचे घोडे जप्त करण्यात आले. दळण वळणाची ही सर्व सुविधा बघता वरिष्ठ नक्षलवादी नेता भूपती येथेच लपून बसला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

महाराष्ट्र व छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेवरील गडचिरोली व नारायणपूर जिल्हय़ाच्या मध्ये असलेल्या अबुजमाडावर नक्षलवाद्यांचे सर्वस्व आहे. त्या भागात भयान शांतता आहे. तिथेच नक्षल शिबीर असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलिस दलाला मिळाली होती. त्या आधारावर अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात विशेष अभियान पथक गडचिरोली हे अबुजमाड भागातील तुंडेवारा व कुपनार गावाजवळील जंगल परिसरात नक्षल विरोध अभियान राबवित होते. अभियान सुरू असतांनाच शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी बंदुकधारी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही आत्मसंरक्षणार्थ नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. चकमकीदरम्यान पोलिसांचा दबाव वाढल्यामुळे भांबावलेले नक्षलवादी आपल्या जवळील साहित्य तिथेच सोडून जंगलात पळून गेले. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा शोध घेतला असता तिथून नक्षलवादी नियमित उपयोगात आणत असलेले सहा घोडे, तीन भरमार बंदुका, दैनंदिन साहित्य तसेच खूप मोठय़ा प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्हय़ाच्या इतिहासात प्रथमच चकमकीदरम्यान नक्षलवाद्यांकडून घोडे जप्त करण्यात आले आहेत. वरिष्ठ नक्षलवादी नेते बऱ्याचदा अबुजमाड जंगल परिसरात घोडय़ांचा वापर करतात. त्याला कारण अबुजमाडचा पहाड ही खूप उंच आणि दऱ्या खोऱ्यांचा आहे. त्यामुळे अशा वेळी नक्षलवाद्यांना जाणे येणे सोयीचे व्हावे म्हणून घोडे उपयोगात आणत असल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व व्यवस्था बघता वरिष्ठ नक्षलवादी नेता भूपती याचा याच जंगलात वावर असण्याची शक्यताही पोलिस दलाने वर्तविली आहे. पोलिसांनी पकडलेले नक्षलवाद्यांचे घोडे धोडराज व नेलगुंडा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आलेले आहे.

पोलीस भूपतीच्या मागावर

अबुजमाड पहाडावर वरिष्ठ नक्षलवादी नेता भूपती असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा पोलिस दल जहाल नक्षलवादी नेता भूपतीच्या मागावर आहे. सध्या गडचिरोलवर भूपतीने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच त्याचा या परिसरात वावर असल्याची माहिती आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2017 1:15 am

Web Title: naxal camp in abujamad forest destroyed
टॅग : Naxal
Next Stories
1 ..तर मुख्यमंत्र्यांना दिवाळी साजरी  करू देणार नाही – राजू शेट्टी
2 विडी कामगारांसाठी नगरमध्ये १ हजार घरकुले- बंडारू दत्तात्रेय
3 सरकार दुकानदार होऊ शकणार नाही – महाजन
Just Now!
X