राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव तसेच विधानसभेची रणनीती ठरण्याची शक्यता आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या दिग्गजांसह आमदार, खासदार, निवडणूक लढलेले नेते आणि कार्यकारिणीतले सदस्य उपस्थित असणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांमध्ये रंगल्या. मात्र या चर्चांना काहीही अर्थ नाही असे राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्त्वाला संधी दिली पाहिजे अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीत मोठे फेरबदल होण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे. विधानसभा निवडणुकीत तरूण नेतृत्त्वाला संधी दिली पाहिजे, पक्षातले साचलेपण दूर करण्यासाठी हे पाऊल उचलले जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.

राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातल्या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत आणि दुष्काळाबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार या सगळ्या अफवा असून अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आता आज होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि विधानसभेत नेमकं काय करायचं? कशी रणनीती आखायची? याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी शिवसेना आणि भाजपा युतीला ४१ जागा मिळाल्या. काँग्रेसला एक तर राष्ट्रवादीला पाच जागांवर समाधान मानावं लागलं. आता या निकालाचा परिणाम विधानसभेवरही होईल अशीही चर्चा रंगली. मात्र विधानसभेसाठी काय रणनीती आखायची? नेमका पराभव का झाला या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे समजते आहे.