नेत्यांची नुसतीच गर्दी असलेल्या राष्ट्रवादीला चौरंगी लढतीमुळे ब्रम्हपुरी, राजुरा व चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत ब्रम्हपुरीत संदीप गड्डमवार थोडय़ा मतांच्या फरकाने विजयापासून दूर राहिले होते. त्यामुळे पराभवाची पुनरावृत्ती टाळायची असेल तर गटबाजी विसरून कठोर परिश्रमाची गरज आहे. मात्र, राष्ट्रवादीला नेत्यांमधील गटबाजीच मारक ठरत आहे.
राज्यात कॉंग्रेस आघाडीचे सरकार असले तरी आघाडीच्या राजकारणामुळे या जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचा म्हणावा तसा विस्तार झालेला नाही. आघाडीच्या विभाजनानंतर जिल्ह्य़ातील नाराज कॉंग्रेस नेत्यांनी या पक्षाची वाट धरली खरी, परंतु या नेत्यांना राष्ट्रवादीची वाट प्रशस्त करण्यात यश आले नाही. गेल्या पंधरा वर्षांत या पक्षाने एका पाठोपाठ एक सात जिल्हाध्यक्ष बदलले. मात्र, या सातही जिल्हाध्यक्षांनी व्यक्तीगत राजकारणाच्या स्वार्थापोटी पक्ष विस्ताराकडे कायम दुर्लक्ष केले. धुन्नु महाराज हे पहिले जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर रमेश कोतपल्लीवार, वामनराव झाडे, विनोद दत्तात्रेय, अरुण धोटे आणि आता राजेंद्र वैद्य व बाळासाहेब साळुंखे या सातही अध्यक्षांची कारकीर्द अतिशय निराशाजनक राहिलेली आहे. आज दत्तात्रेय, धोटेंनी कॉंग्रेस पक्षात कोलांटउडी घेतली आहे, तर धुन्नु महाराज व कोतपल्लीवार राजकारणातून निवृत्त झाले आहेत. अ‍ॅड.बाबासाहेब वासाडे व विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड.मोरेश्वर टेमुर्डे यांचा स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी संपर्क नसल्याने ते थेट साहेबांशी संपर्कात असतात. खासदार सुप्रिया सुळेंची सभा वगळता अन्य सभेत हे दोन्ही नेते दिसले नाहीत.
राष्ट्रवादीचे इतरही नेते केवळ स्वार्थासाठी पक्षाचा उपयोग करीत असल्याचे चित्र येथे बघायला मिळते. जिल्ह्य़ातील बहुतांश नेते तर आपण शरद पवार व अजित पवारांच्या कसे थेट संपर्कात असतो, हे सांगणे मग्न असतात. या पक्षात जेवढे नेते तेवढेच गट असल्याने पक्षकार्य सोडून ही सर्व नेतेमंडळी एकमेकांच्या तक्रारी करण्यात व्यस्त असतात. मुळात जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचा हक्काचा आमदार नसणे हीच बाब या पक्षाचा विस्तार खुंटण्यास कारणीभूत ठरली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम, लक्ष्मणराव ढोबळे व सचिन अहीर जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री होते, परंतु या मंत्र्यांचा स्थानिक पदाधिकाऱ्यांशी कधीच मनमोकळा संवाद व संपर्क होऊ शकला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंचशताब्दी व अन्य योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्य़ाला २५० कोटीचा निधी दिला. ऊर्जा मंत्री व सिंचन मंत्री म्हणून सलग दौरे केले, परंतु कॉंग्रेस आघाडी सरकारचे काम मतदारांपर्यंत पोहोचविण्यात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते अपयशी ठरले. आज जिल्हा पातळीवर या पक्षाची अवस्था नेत्यांचा पक्ष, अशी झाली आहे.
सलग चार वर्षांंपासून राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष, तर बाळासाहेब साळुंखे कार्याध्यक्ष आहेत. फाजील आत्मविश्वास हा राजेंद्र वैद्य यांचा दोष असल्यामुळे ब्रम्हपुरी, राजुरा, बल्लारपूर व भद्रावती पालिकेत त्यांना एकही नगरसेवक जिंकून आणता आलेला नाही. वरोरा पालिका व चंद्रपूर मनपात बोटावर मोजता येईल इतके नगरसेवक या पक्षाचे आहेत. त्यामुळे जि.प. उपाध्यक्ष व सभापतीपदाच्या वर या पक्षाला मजल मारता आलेली नाही. विधानसभा निवडणुकीतही या पक्षाला स्थानिक नेत्यांचा फाजील आत्मविश्वास नडण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस आघाडीत फूट पडल्यानंतर जिल्ह्य़ातील चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी, चिमूर, राजुरा व बल्लारपूर या सहाही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चौरंगी लढतीमुळे ब्रम्हपुरीत संदीप गड्डमवार, चंद्रपुरात अशोक नागापुरे व राजुऱ्यात सुदर्शन निमकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर बल्लारपूर, वरोरा व चिमुरात नाममात्र उमेदवार उभे केले आहेत.
ब्रम्हपुरीत गड्डमवार यांची भाजपचे विद्यमान आमदार प्रा.अतुल देशकर व कॉंग्रेसचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी लढत आहे. गेल्या विधानसभेत अवघ्या सहा हजाराने पराभूत झालेले गड्डमवार सलग पाच वष्रे मतदारांशी संपर्क ठेवून होते. यंदा कॉंग्रेस आघाडी झाली तर त्यांचा विजय निश्चित मानला जात होता, परंतु वडेट्टीवारांच्या उमेदवारीने कॉंग्रेसच्या मतांचे विभाजन होणार आहे. ते रोखण्यात गड्डमवारांना यश आले तर यावर्षी त्यांना संधी आहे.
ब्रम्हपुरीचे माजी नगराध्यक्ष अशोक भय्या यांनी गड्डमवारांना पाठिंबा दिल्याने त्यांची स्थिती भक्कम आहे. चंद्रपुरात राष्ट्रवादीने अशोक नागापुरे या गरीब कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली आहे. ते सलग वीस वष्रे कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. मात्र, पक्षाने ऐनवेळी तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीकडून लढण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते नागापुरेंच्या पारडय़ात पडली तर त्यांना संधी आहे. चोवीस तास समाजासाठी धावून जाणाऱ्या नागापुरे यांना कॉंग्रेसचे स्थानिक नेते व नगरसेवकांची व विविध धर्म व समाजाचा त्यांना सर्व स्तरातून पाठिंबा आहे. मात्र, शामकुळे व जोरगेवारांचे तगडे आवाहन असल्याने त्यांना शहरात आणखी परिश्रम करावे लागणार आहे.
बौध्द, माळी व तेली समाजाला भाजपाकडे जाण्यापासून रोखण्यात नागापुरेंना यश आले तर त्यांना चांगली संधी आहे. राजुऱ्यात सुदर्शन निमकर यांची विद्यमान आमदार सुभाष धोटे, भाजपचे अ‍ॅड.संजय धोटे यांच्याशी लढत द्यायची आहे. सुप्रिया सुळे यांच्या जंगी सभेने राजुऱ्यात राष्ट्रवादीसाठी चांगले वातावरण निर्माण केले आहे. नेमक्या याच चांगल्या परिस्थितीचा फायदा निमकरांना मतांमध्ये बदल करता आला तर त्यांना विजयाची चांगली संधी आहे. बल्लारपुरात राष्ट्रवादीने ऐनवेळी वामनराव झाडे यांना उमेदवारी दिली. बल्लारपुरात नरेश पुगलिया गटाचे घनश्याम मुलचंदानी यांच्या फायद्यासाठी म्हणून येथून ऐन वेळी शहर अध्यक्ष दीपक जयस्वाल व जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी निवडणुकीतून माघार घेतली. वरोऱ्यात विधानसभेचे माजी उपसभापती अ‍ॅड.मोरेश्वर टेमुर्डे यांचे पुत्र जयंत टेमुर्डे, तर चिमुरात अ‍ॅड.गोविंद भेंडारकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण सहा मतदारसंघांपैकी ब्रम्हपुरी, राजुरा व चंद्रपुरात राष्ट्रवादीला संधी आहे. मात्र, नेत्यांनी गटबाजी विसरून कामाला लागायला हवे. केवळ सुप्रिया सुळेंच्या सभेला हजर राहायचे आणि नंतर प्रचारात फिरकायचे सुध्दा नाही, अशी स्थिती राहिली तर कठीण आहे. ही निवडणूक या पक्षासाठी करो किंवा मरो, अशी झालेली आहे.