राष्ट्रवादी काँग्रेसचे खंदे नेते अशी ओळख असलेले गणेश नाईक भाजपात प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर सडेतोड टीका केली असून गणेश नाईक यांनी अत्यंत पद्धतशीरपणे राष्ट्रवादी संपवली असा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी आपण वारंवार कल्पना देऊनही पक्षाने कधी आमच्यावर विश्वास ठेवला नाही अशी खंतही व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, “२०१४ साली जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हाच गणेश नाईक यांना पक्ष सोडायचा होता. गणेश नाईक यांच्या मांडीच्या हाडाचं ऑपरेशन होतं आणि तिकडे बैठक चालू होती. तेव्हा शरद पवारांनी घरी बोलावून सांगितलं की, गणेश नाईक कधीच गद्दारी करणार नाहीत हे पत्रकार परिषद घेऊन सांग. त्यानंतरच्या घडामोडी सांगू शकत नाही”.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यामुळेच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, मीरा भाईंदर येथे राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नसल्याचा आरोप केला. “कल्याण डोंबिवलीत आणि मीरा भाईंदरमध्ये सत्ता असतानाही आणि भिवंडीत चांगली ताकद असतानाही आमचा एकही आमचा नगरसेवक नाही. आणि सगळ्याची जबाबदारी कोणावर होती तर गणेश नाईक यांच्यावर होती”, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

गणेश नाईक पाच वर्षात पक्ष साफ करतील आणि ऐनवेळी सोडून जातील अशी मी पक्षाला कल्पना दिली होती. पण दुर्दैवाने पक्षाने माझ्या म्हणण्याकडे लक्ष दिलं नाही असं सांगताना जी काही फाटाफूट व्हायची त्यामागे गणेश नाईक यांची ताकद असायची असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

कुठलाही पक्ष घरात बसून चालत नाही. सारंजामशाही संपली आहे असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी लगावला. स्वाभिमानाच्या गप्पा मारणाऱ्या गणेश नाईक यांच्याविरोधात मंदा म्हात्रे वाट्टेलल ते बोलत आहेत. मग आता त्यांचा स्वाभिमान कुठे गेला ? असा सवाल त्यांनी विचारला.

पवार साहेबांनी काय कमी दिलं अशी विचारणा करताना गणेश नाईक यांनी स्वत:च्या कुटुंबाशिवाय नवी मुंबईत ठेवलंय काय ? अशी विचारणा जितेंद्र आव्हाड यांनी केली. विकास केला ठीक आहे पण फक्त घरच्यांचा विकास करायचा नसतो असा टोलाही त्यांनी लगावला.

हे उघड्या डोळ्यांनी दिसत असताना, कल्पना देत असताना मी सांगूनही पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पक्षाने कायम गणेश नाईकांना वरची बाजू दिली अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. हे पक्ष खड्ड्यात घालणार, त्यावर माती टाकून उभे राहणार हे मला माहिती होतं असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. हा पक्ष पुन्हा एकदा उभा करु आणि त्याची सुरुवात नवी मुंबईतूनच करु असा निर्धार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.