जिल्ह्यातील वसमत व कळमनुरी नगरपालिकांमध्ये अध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली असून, िहगोलीतून राष्ट्रवादीच्या अनिता सूर्यतळ यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्या नावाची घोषणा केवळ बाकी आहे. वसमत येथे ५, तर कळमनुरीत ३जणांनी  अध्यक्षपदासाठी अर्ज भरल्याने निवडीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
िहगोली पालिकेत राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असून अध्यक्षपद अनुसूचित जाती महिला वर्गासाठी आहे. राष्ट्रवादीच्या सूर्यतळ प्रबळ दावेदार आहेत. काँग्रेसमध्ये आशाताई उबाळे इच्छुक असल्या, तरी बहुमताअभावी त्यांनी उमेदवारी केली नाही. उमेदवारी दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी केवळ सूर्यतळ यांचाच अर्ज दाखल झाला. आता त्यांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. उपाध्यक्ष पदासाठी मात्र चांगलीच स्पर्धा होईल, असे चित्र आहे. बिरजू यादव, अमेर अली यांच्यात चुरस असेल, अशी चर्चा आहे.
कळमनुरीत काँग्रेसच्या यास्मीनबी शेख फारूख यांचे २, मुक्तारबी हमीदुल्ला पठाण यांचा १ व शिवसेनेच्या गिरिजाबाई बाबाराव पोटे यांचा असे ४ अर्ज दाखल झाले. येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत असल्याने खासदार राजीव सातव यांच्या मर्जीप्रमाणे अध्यक्षाची निवड केली जाईल, असे चित्र आहे. वसमतला शिवसेनेचे राजेश पवार व सारिका हळवे पाटील, भाजपकडून भगवान कुदळे व शिवदास बोड्डेवार, तर राष्ट्रवादीकडून शशिकुमार कुल्थे या ५ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. येथे भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत आहे. परंतु विधानसभा निवडणुकीचा पाश्र्वभूमीवर येथील नगराध्यक्ष भाजपचा की शिवसेनेचा, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण युतीत ठरलेल्या कराराप्रमाणे सुरुवातीची अडीच वर्षांत प्रत्येकी सव्वा वर्षांचा कार्यकाळ त्या-त्या पक्षाने वाटून घेतला होता. परंतु आता विधानसभेच्या निवडणुकीमुळे दोन्ही पक्षांना पहिल्याप्रमाणेच प्रत्येकी सव्वा वर्षांसाठी अध्यक्षपद हवे असल्याने त्यांच्यात तडजोड होणार काय, याची उत्सुकता आहे. शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या निर्णयावरच अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे ठरणार आहे.