-हर्षद कशाळकर 
रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव दिसू लागला आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरवात झाली असून अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त,र वीज पुरवठाही खंडीत झाला आहे.

सकाळी दहा वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोरही वाढला. यानंतर किनारपट्टीवरील भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले. मरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या. काही इमारतींवरील पत्रे उडून गेले. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नाही. रेवदंडा येथील साळाव पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

वादळाचा प्रभाव श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यात जास्त असल्याने, अलिबाग येथील एनडीआरएफच्या दोन टिम मुरुडकडे रवाना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात १३ हजार ५४१ जणांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात वादळाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरीकांना घरातच राहण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाला असला तरी दूरसंचार यंत्रणा सुरु आहेत.