06 July 2020

News Flash

‘पेड न्यूज’च्या उगमस्थानी ना नोटीस, ना कारवाई!

नांदेड हे ‘पेड न्यूज’चे उगमस्थान. २००९ मध्ये येथून सुरू झालेले हे लोण फोफावले. मात्र, गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पेड न्यूजप्रकरणी एकही ठोस स्वरुपाची तक्रार

| April 19, 2014 01:35 am

नांदेड हे ‘पेड न्यूज’चे उगमस्थान. २००९ मध्ये येथून सुरू झालेले हे लोण फोफावले. मात्र, गुरुवारी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पेड न्यूजप्रकरणी एकही ठोस स्वरुपाची तक्रार नोंदली गेली नाही किंवा वृत्तपत्रातील मजकुरांचे अवलोकन करून पेड न्यूजप्रकरणी मूल्यांकन करणाऱ्या समितीने एकही नोटीस बजावलेली नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर तत्कालिन मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना पेड न्यूज प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले. २०१० मध्ये पत्रकार पी. साईनाथ यांनी बाहेर काढलेले हे प्रकरण देशभर गाजले. आजही ते न्यायप्रविष्ट आहे. पण त्यामुळे चव्हाण यांना निवडणूक लढविण्यासाठी बाधा निर्माण झाली नाही. विलक्षण नेटाने आणि प्रचंड माहिती संकलित करून हे प्रकरण लावून धरणारे पी. साईनाथ ‘द हिंदू’ या दैनिकातून काही दिवसांपूर्वी मुक्त झाले आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रेस कौन्सिलला नांदेडच्या पेड न्यूज प्रकरणात लक्ष घालावे लागले. पेड न्यूज संदर्भात आयोगाने सुस्पष्ट सूचना दिल्याने या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांसह बहुसंख्य उमेदवारांनी ताकही फुंकून प्यावे एवढी काळजी घेतली. अर्थात वृत्तपत्रात आलेला मजकूर अशोकरावांच्या नावानेच अधिक भरलेला आहे. मात्र, १०० हून अधिक प्रचारफेऱ्या व भाषणांमुळे त्यांना प्रसिद्धी अधिक मिळाली. प्रसिद्धी पत्रके एकाच मजकुराची असू नये, याची काळजीही काँग्रेसने घेतली होती. त्यामुळे ते पेड न्यूजच्या कारवाईत अडकले नाहीत. सपाचे उमेदवार बालाजी शिंदे यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पाच-सहा वर्तमानपत्रांची नावे नमूद करून तक्रार दिली होती. मात्र निवडणूक यंत्रणेने कारवाई केली नाही. ना भाजपने तक्रार नोंदविली, ना काँग्रेसने. मागील कटू अनुभव लक्षात घेता अशोकराव चव्हाण आणि त्यांची यंत्रणा या बाबतीत अधिक सजग होती. या यंत्रणेत एक विधिज्ञ होता, हे विशेष.  दैनंदिन खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी एक सनदी लेखापालही कार्यरत होता. भाजपच्या उमेदवाराने त्यांच्या नियोजनाची यंत्रणा जावयाकडे सुपूर्द केली होती. त्यामुळे त्यांच्या प्रसिद्ध मजकुरावर फारसे कोणाचे लक्ष नव्हते. चव्हाणांना मात्र रोज बातम्यांच्या कात्रणांचा संच आवर्जून दाखविला जात असे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2014 1:35 am

Web Title: no notice no action in paid news issue
टॅग Election,Nanded
Next Stories
1 मतदानानंतर प्रमुख उमेदवार ‘नॉट रिचेबल’!
2 उदयनराजेंसह चौघांना धमकावल्याप्रकरणी नोटीस
3 रुसवा संपला, बागडे प्रचारात आले हो!
Just Now!
X