शेतकऱयांची कर्जमाफी आणि गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरून पावसाळी अधिवेशनाच्या सलग तिसऱया दिवशी बुधवारी विरोधकांनी गोंधळ घातला. विधानसभेत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून विरोधकांनी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर सभात्याग केला. विधान भवनाच्या पायऱयांवर बसून विरोधकांनी सरकारच्या धोरणांचा निषेध केला. त्याचबरोबर टाळ वाजवूनही विरोधकांनी सत्ताधाऱयांचे लक्ष वेधून घेतले. याच मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे विधान परिषदेचे कामकाज एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून विरोधक शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक आहेत. कर्जमाफी देण्याचा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला असताना, विरोधकांनीही विरोधाचा सूर अधिक तीव्र केला. विधान भवनाच्या पायऱयांवर बसून विरोधक कर्जमाफीची मागणी लावून धरत आहेत. बुधवारीही टाळांच्या गजरात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी सरकाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. ‘चिक्की सरकार हाय हाय’, ‘बोगस सरकार हाय हाय’, ‘नही चलेगी, नही चलेगी दादागिरी नही चलेगी’ अशा घोषणा यावेळी देण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षाचे सर्व आमदार यावेळी उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांना अटकाव निषेधार्ह
विधान भवनाच्या पायऱयावर बसून आंदोलन करणाऱया विरोधकांचे चित्रीकरण करण्यास विधीमंडळातील अधिकाऱयांनी अटकाव केल्यावर विरोधकांनी त्याला तीव्र विरोध केला. सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करते आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. यावेळी अजित पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून सभागृहातल्या बातम्या सामान्यांना कळविण्याचे काम प्रसारमाध्यमे करत आहेत. मात्र, प्रसारमाध्यमांना अटकाव करण्याची ही बाब निषेधार्ह आहे.