रवींद्र केसकर

उस्मानाबाद : राज्यातील सर्वाधिक करोना मृत्युदर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला अक्षरशः रिक्तरोगाने ग्रासले आहे. नॉनकोव्हिड २५० आणि कोव्हिड विभागातील ४०० अशा एकूण ६५० खाटांची धुरा सध्या फक्त २० डॉक्टर पेलत आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जिल्हा रुग्णालयाला झालेली रिक्त रोगाची बाधा यामुळे उपचाराचा दर्जाही खालावत चालला आहे. परिणामी जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या मृत्यूदराचा आलेख राज्यात सर्वाधिक आहे. करोनाकाळात साधनसामग्री खरेदीत गुंतलेले प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाट्याला सुविधांचा कायम वाणवा आहे. भाळी मागासपणाचा शिक्का असल्याने केंद्र आणि राज्य सरकारनेही सातत्याने दुर्लक्ष केले आहे. राज्यात करोनाबाधितांच्या मृत्यूचा सर्वाधिक दर उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तरीदेखील जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला रिक्त रोगाने अक्षरशः ग्रासले आहे. त्यातच कर्तव्यावर असलेल्या १० वैद्यकीय अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे तर एकाने स्वतःला अलगिकरणात कोंडून घेतले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी वर्ग एकच्या एकूण ३२ पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी तब्बल १९ पदे करोनाकाळातही रिक्त आहेत. वीस लाख लोकसंख्या असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या आरोग्यसेवेची जबाबदारी सध्या १३ वैद्यकीय अधिकारी पाहत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा दर्जा अबाधित राखण्यासाठी अन्य संवर्गातील ४७४ जागांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यातही ९२ जागा रिक्त आहेत. कार्यरत असलेल्या ३८२ पैकी अनेकांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाच्या तणावाखाली काम करण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात एकही मोठा खाजगी दवाखाना नाही. त्यामुळे उपचाराचा सर्वाधिक ताण जिल्हा शासकीय रुग्णालयावर आहे. जिल्हा रुग्णालयासाठी वर्ग एकच्या १९ जागा मंजूर आहेत. त्यातील तब्बल १३ जगा रिक्त आहेत. कार्यरत असलेल्या सहापैकी एकाला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच सक्तीच्या रजेवर पाठविले आहे तर आणखी एकावर जिल्हा शल्य चिकित्सक पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला आहे. त्यामुळे वर्ग एकचे केवळ चारच वैद्यकीय अधिकारी थेट रुग्णसेवा बजावत आहेत. वर्ग दोनच्या सर्व ३१ पदांची पूर्तता करण्यात आली आहे. त्यातीलच दोघांना उमरगा आणि वाशी येथे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. तर तब्बल ११ जण करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने घरी किंवा खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. विद्यापीठ उपकेंद्रातील प्रयोगशाळेत दोघांना नियुक्त करण्यात आल्याने शेकडो रुग्णांच्या संतापला सामोरे जाण्याची दुर्दैवी वेळ केवळ २० वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच अन्य संवर्गात देखील ४० टक्के पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयात मंजूर असलेल्या २२० पैकी तब्बल ५६ जागा आजही रिक्त आहेत. रिक्त पदामुळे निर्माण होत असलेली बाधा आणि त्यामुळे उदभवलेल्या समस्या सोडविण्यासाठी मात्र विशेष प्रयत्न होताना दिसून येत नाहीत.

जिल्हा रुग्णालयातील १० डॉक्टरांना लागण

उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेल्या १० वैद्यकीय अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. तर एकजण करोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने गृह विलगीकरणात आहेत. बाधा झालेल्यांमध्ये तीन बालरोगतज्ञ, दोन सर्जन, एक स्त्रीरोगतज्ज्ञ आणि एका पॅथॉलॉजिस्टचा समावेश आहे. बहुतेकांनी खाजगी रुग्णालयात किंवा घरी राहून उपचार करून घेतले आहेत. यातील अनेकांचा गृह विलगीकरण कालावधी पूर्ण होत आला आहे.

नेत्रविभाग बंद, क्षयरोग आणि एड्स निर्मूलन कक्षाकडे दुर्लक्ष

मनुष्यबळाआभावी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नेत्रविभाग मागील महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे मोतीबिंदूवरील सर्व शस्त्रक्रिया ठप्प आहेत. करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने अनेक अत्यावश्यक सेवांनाही त्याचा फटका बसत आहे. एड्स निर्मूलन कक्ष आणि क्षयरोग विभागाकडेही अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दुर्लक्ष होत आहे. त्यातच पावसाळ्यात ओढवणाऱ्या साथरोगांची टांगती तलवारही आरोग्य यंत्रणेच्या डोक्यावर लटकत आहे.