बेशिस्त वाहनचालक, बेकायदा पार्किंगचा फटका

पालघर शहरातील वाहनांची संख्या वाढली असून बेशिस्तपणे वाहन चालवणाऱ्या चालकांमुळे तसेच रस्त्याकडेला बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांमुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीवर नियंत्रण ठेवण्यास वाहतूक पोलीस अपयशी ठरत असल्याचे दिसून आले आहे.

पालघर शहरातील माहीम व मनोर रस्त्यावर अनेकदा दुचाकी व चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जाते. त्याचबरोबरीने शहरातील तीन आसनी व सहा आसनी रिक्षांची संख्या वाढली असून अनेक ठिकाणी या वाहनांसाठी नव्याने वाहनतळ उभे राहिले आहेत. त्यामुळे रेल्वेगाडीचे आगमन झाल्यानंतर खासगी वाहने, रिक्षा व एसटी बस एकाच वेळेला बाहेर पडत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे.

पालघर शहरातील रेल्वे स्थानकाबाहेर तसेच हुतात्मा स्तंभ, जगदंबा नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक ही ठिकाणे वाहतूक कोंडीसाठी अलीकडच्या काळात प्रसिद्ध झाली आहेत. या ठिकाणी अनेकदा वाहतूक पोलीस कार्यरत असले तरी वाहनांची संख्या आणि वाहन चालकांची बेशिस्ती व अरेरावी यांमुळे वाहनाच्या लांबलचक रांगा लागल्याचे दिसून येते. त्याचबरोबरीने सकाळी व सायंकाळी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत, कामावर जाण्याच्या प्रहरी वाहतूक पोलीस चौकांमध्ये उपलब्ध राहत नसल्याने ही कोंडी फोडण्यास सर्वसामान्य नागरिकांना पुढाकार घ्यावा लागत असल्याचे दिसून आले आहे. पालघर हुतात्मा स्तंभ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेकदा काही माजी नगरसेवक व नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे.

रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडीमध्ये भर

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री हनुमान मंदिर दरम्यान रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले असल्याने या रस्त्यावर पुढील दोन महिने एका दिशेने वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. परिणामी पालघर शहरातून बाहेर पडणारी वाहने हुतात्मा स्तंभ, जगदंबा नाका व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे, छत्रपती शिवाजी चौक अशी बाहेर पडत असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्या अधिक गहन बनली आहे. हे पाहता शहरातील या सर्व प्रमुख चौकांमध्ये सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक पोलीस कार्यरत ठेवण्याची मागणी पुढे येत आहे.