करोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अद्यापही निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आलेले नाहीत. महत्त्वाचं म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी एकादशीची वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारच्या निर्णयावरून भाजपाकडून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याकडून उत्तर दिलं जात असल्याचं चित्र आहे. आता भाजपाने पुन्हा एकदा थेट उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत पलटवार केला आहे. “उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांवरच अभिषेक करा म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा,” असा टोला भाजपाने लगावला आहे.

वारकरी संप्रदायामध्ये आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, करोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारी रद्द करण्यात आल्या. यंदाही करोनाच्या संकटामुळे आषाढी वारी रद्द करण्यात आली. मोजक्याच दिंड्यांना परवानगी देण्यात आली. या दिंड्या बसमधूनच पंढरपुरात दाखल होणार आहेत. मात्र, या निर्णयावर भाजपाकडून टीका करण्यात आली. भाजपाकडून करण्यात आलेल्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा- ‘आषाढी’साठी नियमावली जाहीर ; देहू व आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी

त्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “सरकारी कार्यक्रम धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या खंडणी सरकारने आषाढी एकादशीच्या वारीवर मात्र बंदी घातली. आपल्या संतप्त भावनांना वारकऱ्यांनी अचूक शब्दात व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरे, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा म्हणजे थोडक्यात तुमच्या योग्यतेप्रमाणे काम करा,” अशी टीका भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

हेही वाचा- पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी देहूमध्ये वारकऱ्यांची करोना चाचणी

भातखळकर यांनी हे ट्वीट करताना मागच्या वर्षीची वारकऱ्यांच्या प्रतिक्रियेची बातमीही पोस्ट केली आहे. या बातमीत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर वारकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. ‘शरद पवार हे आमचे विठ्ठल आहेत’, असं राऊत म्हणाले होते. त्यावर वारकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचाच अभिषेक करावा अशी टीका केली होती.