दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेले आणि विविध बॉम्बस्फोटातील फरार आरोपींच्या शोधार्थ दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि निरनिराळ्या तपास यंत्रणा सक्रिय असल्या तरी या कार्यवाहीत आपलाही छोटासा वाटा असावा म्हणून धुळे जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी कक्षाने ‘पॉकेट कार्ड’ उपक्रम राबविला आहे. दहशतवादी किंवा अतिरेकी कारवाया करणाऱ्यांचे चेहरे आणि अन्य ओळख कायम नजरेसमोर राहावी, त्यांना पकडण्यास मदत व्हावी म्हणून हे कार्ड तयार करण्यात आले असून त्यात तपास यंत्रणांचे फोन नंबर, ‘मोस्ट वाँटेड’ सात दहशतवाद्यांची छायाचित्रे, त्यांचा गुन्ह्य़ातील
सहभाग अशी सविस्तर माहिती देतानाच नागरिकांना दैनदिन उपयोगात येईल असे २०१५ या वर्षांची दिनदर्शिका असे या कार्डचे स्वरूप आहे.
देशातील मोठी शहरे, खेडी, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी दहशतवादी, अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी आरोपींची छायाचित्रे असलेले फलक लावले आहेत. ठिकठिकाणी भिंतींवर ही माहिती चिकटविण्यात आल्याचेही दिसते. हेच सर्व काही आता धुळे पोलिसांनी खिशात, पाकिटात मावेल अशा स्वरूपात तयार केले आहे. पाकीट कार्डावर वेगवेगळ्या सात आरोपींची छायाचित्रे, दहशतवाद विरोधी कक्षाच्या मुंबई, धुळ्यातील फोन नंबर, जिल्ह्य़ातील निरनिराळ्या पोलीस ठाण्यांचे व  अधिकाऱ्यांचे फोन नंबर यांचा समावेश आहे. या कार्डमध्ये देशाच्या तपास यंत्रणेला हवे असलेले असलम उर्फ मोहम्मद अस्लम उर्फ शोएब उर्फ बिलाल उर्फ संतो, मोहम्मद आयुब खान (२८, रा. खंडवा,मध्यप्रदेश), मोहम्मद मलिक उर्फ सल्लू लतिफ अब्दूल हकिम (४०, गुलशननगर, खंडवा), मोहसीन इस्माईल चौधरी सय्यद (३३, पुणे), मेहबूब उर्फ गुड्डू इस्माईल खान (३२,खंडवा), जाकीर हुसेन सादीक उर्फ विक्की डॉन उर्फ विनय कुमार (४०, खंडवा), अमजद खान रमजान खान (२६, खंडवा), अज्जाजुद्दीन उर्फ रियाज उर्फ राहुल मोहम्मद अजुउद्दीन (४०) या सात आरोपींच्या छायचित्रांचा आणि
त्यांच्या सविस्तर माहितीचा समावेश आहे. सर्वसामान्यांमध्ये नाव बदलून आणि वेषांतर करून राहणाऱ्या या गुन्हेगारांना शोधण्यासाठी लोकांची मदत घेण्याच्या उद्देशाने या कार्डची कल्पना पोलिसांनी वास्तवात आणली आहे.
संतोष मासोळे, धुळे