20 November 2017

News Flash

प्रदूषित चंद्रपुरातील ‘फ्लाय अॅश’ व्यापार मेळाव्यातील मुख्य आकर्षण

प्रदूषणात देशात चौथ्या क्रमांकावर असलेल्या चंद्रपुरातील ‘फ्लाय अॅश’ दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय भारतीय

प्रतिनिधी, चंद्रपूर | Updated: November 22, 2012 7:18 AM

प्रदूषणात देशात चौथ्या क्रमांकावर असलेल्या चंद्रपुरातील ‘फ्लाय अॅश’ दिल्ली येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय भारतीय व्यापार मेळाव्यात आकर्षणाचे मुख्य केंद्र बनली आहे. हाय फ्लाय अॅश क्लस्टर प्रा.लि.चे अध्यक्ष प्रवीण जानी व त्यांचा मुलगा मेघनाद जानी यांनी या आंतरराष्ट्रीय मेळाव्यात फ्लाय अॅशपासून तयार होणाऱ्या उत्पादनाचा स्टॉल लावून देशी-विदेशी उद्योजकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 औद्योगिकदृष्टय़ा झपाटय़ाने प्रगती होत असलेल्या या जिल्हय़ात इतके प्रदूषण आहे की, राख व कोळशाचा धुर अक्षरश: आकाशात बघायला मिळतो. त्याचा परिणाम चंद्रपूरची नोंद देशात चौथ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर, अशी घेण्यात आली आहे. या प्रदूषणात भर टाकण्याचा सर्वाधिक वाटा हा कोळसा उद्योग व वीज केंद्राच्या चिमणीतून निघणाऱ्या फ्लाय अॅशचा आहे. फ्लाय अॅशमुळे वीज केंद्राच्या परिसरातील शेतजमीन नापेर झालेली आहे. इतकी विखारी असलेली फ्लाय अॅश सध्या दिल्ली येथे सुरू असलेल्या आईआईटीएफ अर्थात, आंतरराष्ट्रीय भारतीय व्यापार मेळाव्यात देशी-विदेशी उद्योजकांसाठी आकर्षणाचे मुख्य केंद्र बनली आहे. त्यामागची कल्पकता आहे ती हाय फ्लाय अॅश क्लस्टर प्रा.लि.चे अध्यक्ष प्रवीण जानी व त्यांचा मुलगा मेघनाद जानी या बापलेकाची. टाईम इंजिनिअरिंगचे संचालक असलेल्या जानी यांच्या पुढाकाराने जिल्ह्य़ातील ५० उद्योजकांनी एकत्र येऊन हाय फ्लाय अॅश क्लस्टर प्रा.लि. या कंपनीची स्थापना केली. केंद्र शासनाव्दारे अनुदान देण्यात येणाऱ्या या कंपनीच्या माध्यमातून भविष्यात फ्लाय अॅशपासून विविध वस्तू तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने विटांचा समावेश आहे, मात्र या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात अॅशपासून तयार होणाऱ्या २० उत्पादनांना ठेवण्यात आल्याची माहिती क्लस्टरचे संचालक व व्यापार मेळाव्यात चंद्रपूरचे प्रतिनिधित्व करणारे मेघनाद जानी यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले.
राखेपासून विटा तयार करण्याच्या पारंपारिक उद्योगासोबतच वॉशिंग पावडर, रांगोळी, होळीचे रंग, रेडिमिक्स मसाला, एंटी रस्ट टीएमटी बार कोटिंग, पेंट या वस्तूही व्यापार मेळाव्यात ठेवण्यात आलेल्या आहेत. या वस्तू बघून एका आदिवासी व प्रदूषित जिल्ह्य़ातून मेळाव्यात अशाप्रकारची नवी संकल्पना घेऊन आलेला उद्योग बघून देशी-विदेशी उद्योगही आश्चर्यचकीत झाले आहेत. निकामी असलेल्या या फ्लाय अॅशपासून शेकडो वस्तूंची निर्मिती करण्यात येऊ शकते. सिमेंटमध्ये प्रामुख्याने अॅशचा उपयोग मोठय़ा प्रमाणात होत असून त्यामुळे सिमेंट उद्योगाचा नफा व्दिगुणित झालेला आहे. अॅशपासून तयार होणाऱ्या या वस्तूंची किंमत दोन रुपयापासून तर २५ हजार रुपयांपर्यंत आहे.
आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात हा स्टॉल बघून केंद्रीय कोळसा मंत्री प्रतीक पाटील, राज्याच्या उद्योग विकास आयुक्त रस्तोगी, कोळसा मंत्रालयाच्या सचिव, तसेच उद्योग मंत्रालयाच्या सचिवांनी अतिशय कुतूहलाने भेट देऊन अॅशपासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंची माहिती जाणून घेतली. या मेळाव्यात देशभरातील अडीच ते तीन हजार उद्योगाने स्टॉल लावले आहेत. हा मेळाव्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती जानी यांनी दिली. दरम्यान तत्पूर्वी दिल्ली येथेच नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीजच्या वतीने ओखला इंडस्ट्रीयल एरियात ६ ते ८ नोव्हेंबर पर्यंत उद्योग प्रदर्शनी लावण्यात आली होती. बिल्डींग मटेरिअल अॅन्ड टेक्नॉलॉजी प्रमोशन कॉन्सीलच्या वतीने आयोजित या प्रदर्शनीतही फ्लाय अॅशचा स्टॉल आकर्षणाचे केंद्र होता. केवळ सिव्हील कस्ट्रक्शन वस्तुंचाच या प्रदर्शनीत समावेश होता. उद्योग मंत्रालयाचे सचिव, तसेच उपसचिवांनी अॅशच्या स्टॉलला भेट देबघाून कौतूक केले. आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात प्रदूषणाचे मुख्य केंद्र ठरलेली फ्लाय अॅश उद्योजकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरल्याची प्रतिक्रिया केंद्रीय कोळसा मंत्री प्रतिक पाटील यांनी व्यक्त केली. एकूणच फ्लाय अॅश क्लस्टरचे व्यापार प्रदर्शनीत कौतूक होत आहे.

First Published on November 22, 2012 7:18 am

Web Title: poluted fly ash attraction in business meet