अमरावती जिल्ह्य़ात सर्वाधिक बळी
रस्ते अपघातांचा सर्वाधिक फटका अनुसूची एकमध्ये असलेल्या काळवीट या वन्यप्राण्याला बसला असून, अमरावती जिल्ह्य़ात काळविटांचे सर्वाधिक बळी गेले आहेत. निसर्ग संवर्धनासाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आययुसीएनच्या लाल यादीत ‘निअर थ्रिटेन्ट’ या वर्गात समाविष्ट काळविटांची संख्या आता भारतात केवळ ५० हजारांच्या घरातच शिल्लक राहिली आहे. अहमदनगर जिल्ह्य़ातील देऊळगाव-रेहेतुरी अभयारण्य व वाशिम जिल्ह्य़ातील कारंजा सोहोळ अभयारण्य काळवीट संवर्धनासाठी राखीव करण्यात आले आहेत. मात्र, या दोन्ही अभयारण्यांतील काळवीट संवर्धनाचे प्रयत्न तोकडे पडत आहेत.
अ‍ॅन्टेलोप या प्रकारातील सहा प्रकारचे सस्तन प्राणी भारतात दिसतात. त्यापैकी काळवीट आणि नीलगाय सहजपणे, तर चौसिंगा या दाट वनात राहणाऱ्या प्राण्याचे दर्शन दुर्मिळ झाले आहे. कृष्णमृग या नावाने ओळखले जाणारे काळवीट महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, गुजरात व मध्य भारताच्या काही भागात आढळून येतात. प्रामुख्याने १० ते ५० च्या संख्येने यांचा कळप पठारी व मैदानी भागातील गवती कुरणे आणि माळरानावर दिसून येतो. विदर्भात काही ठिकाणी तो सहजपणे दिसतो.
विविध प्रकल्पांमुळे काळविटाचा मूळ अधिवास विस्कळीत झाला आहे. शेती परिसरातील वाढत्या वावरामुळेसुद्धा त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या अधिवासात गुरेचराई होत असल्यामुळे त्यांना ‘बोवाइन’ नावाच्या आजारानेही ग्रासले आहे. अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर, भातकुली, परतवाडा, चांदूरबाजार, आसेगाव, खोलापूर, तर यवतमाळ जिल्ह्य़ातील दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, वाशिम जिल्ह्य़ातील कारंजा, मानोरा, अकोला जिल्ह्य़ातील मूर्तिजापूर, बार्शी टाकळी परिसरातील शेतात त्यांचा वाढता वावर त्यांच्या जीवावर बेतत आहे. नागपूरलगतसुद्धा त्याचे अस्तित्त्व असून या परिसरातसुद्धा हा प्राणी रस्ते अपघातांचा बळी ठरला आहे. कृष्णमृत व नीलगायींचे रस्ते अपघातात वाढत जाणारे मृत्यू आणि त्यामुळे त्यांची कमी होणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे. त्यांच्या अधिवासात होणारा मानवी हस्तक्षेप त्यासाठी कारणीभूत ठरत असून नागरिकांनी त्यांच्या अधिवास संरक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक असल्याचे मत अमरावती येथील वन्यजीव अभ्यासक यादव तरटे-पाटील यांनी व्यक्त केले.

अपघातातील मृतसंख्या
अमरावती-दर्यापूर रस्त्यादरम्यान २०१२ मध्ये २, २०१३ मध्ये ३, २०१४ मध्ये २, तर २०१५ मध्ये १, असे एकूण ९ काळवीट अपघातात मृत्यू पावले आहेत. अमरावती-परतवाडा मार्गावर २०१२ मध्ये १, २०१३ मध्ये १, २०१४ मध्ये २ आणि २०१५ मध्ये १, असे एकूण ५ काळवीट रस्ते अपघातातच मृत्यू पावले आहेत. कारंजा-अमरावती मार्गावर २०१३ मध्ये ३, तर अमरावती-नेर मार्गावर २, काही दिवसांपूर्वीच अमरावतीलगत अकोली रेल्वे स्थानकाजवळ १, अमरावती रस्त्याने ३, तर दोन दिवसांपूर्वीच अमरावतीतील साईनगर परिसरात काळवीट मृत्यू पावले.