आर्थिक अडचणीतून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादाला कंटाळून एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या गर्भवती पत्नीने चार वर्षांच्या मुलाला कंबरेला बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत शिल्पा हरिदास चौधरी, तिचा मुलगा प्रथमेश यांचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मूलजवळ असलेल्या फिस्कुटी येथील रहिवासी हरीदास चौधरी यांचा विवाह सावली तालुक्यातील घोडेवाही येथील पुंडलिक कावळे यांची मुलगी शिल्पासोबत २०११ मध्ये झाला. अवघ्या पाऊण एकर शेतीवर सासू, सासरे, मुलगा, पती, पत्नी असे कुटुंब जगत असतांनाच मागील काही दिवसांपासून या अल्पभूधारक शेतकऱ्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्यातून पती पत्नीत वाद होण्यास सुरुवात झाली.

या वादाचे रूपांतर विकोपाला गेले. अशाही स्थितीत शेती आणि मोलमजुरी करून संसार सुरू होता. शनिवारी हरिदास आणि शिल्पाचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातच शिल्पा मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मुलगा प्रथमेशला घेऊन बाहेर पडली. घरासमोरच्या विहिरीत मुलासह तिने उडी घेतली. रात्रीची वेळ असल्याने ही घटना कुणाला कळली नाही.

दरम्यान, सकाळी पत्नी व मुलगा दिसत नाही म्हणून हरीदासने शोधाशोध सुरू केली. सासरी गेली असावी म्हणून विचारपूस सुरू असतांनाच गावातील एक महिला विहिरीवर पाणी भरण्यासाठी आली असता तिला शिल्पाचा मृतदेह पाण्यावर तरंगतांना दिसला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तपास करून कौटुंबिक कलहातून ही घटना झाल्याने पती हरीदास व सासू सासऱ्यांना ताब्यात घेतले आहे.