प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय जनता पक्षाला जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) मिळाला. या पदावर प्रा. भानुदास रतन बेरड यांची आज, गुरुवारी दुपारी नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाच्या मुंबईत झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी ही नियुक्ती जाहीर केली. आपण जिल्हय़ात पक्षातील कोणत्याच गटाचे नसल्याने आपली या पदावर नियुक्ती झाल्याचा दावा करताना बेरड यांनी जिल्हय़ात आपण सरकारची व पक्षाची प्रतिमा उजळण्यासाठी प्रयत्न करू, असे ‘लोकसत्ता’शी नियुक्तीनंतर बोलताना सांगितले.
मुंबईतील बैठकीतच खा. दानवे यांनी कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांची प्रदेश चिटणीसपदीही नियुक्ती केली आहे.
भाजपने पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष व ग्रामीणचे जिल्हाध्यक्षपद स्वतंत्र केल्यानंतर प्रथमच बेरड यांची या पदावर नियुक्ती केली आहे. गेल्या सुमारे वर्षांपासून अधिक काळ हे पद रिक्त होते. शहर जिल्हाध्यक्ष म्हणून अभय आगरकर यांची नियुक्ती झालेली आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर खा. दिलीप गांधी यांना उमेदवारी जाहीर केल्याच्या कारणावरून  प्रताप ढाकणे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा व पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यापूर्वीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनीही भाजपचा राजीनामा देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ढाकणे यांच्या राजीनाम्यानंतर लगेचच जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती करणे पक्षाला गटातटामुळे शक्य झाले नाही. परिणामी जिल्हाध्यक्षाशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागले.
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासह प्रा. बेरड, नितीन कापसे आदींची नावे जिल्हाध्यक्षपदासाठी चर्चेत होती. नंतर कदम शिर्डी देवस्थानच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्याने त्यांचे नाव जिल्हाध्यक्षपदासाठी मागे पडले. प्रदेशाध्यक्ष दानवे नगरमध्ये आले होते. त्यांनी लवकरच जिल्हाध्यक्ष नियुक्त केला जाईल, असे जाहीर केले होते, त्याला दोन महिन्यांनंतर मुहूर्त लाभला.
नियुक्तीनंतर लोकसत्ताशी बोलताना बेरड यांनी सांगितले, की जिल्हय़ातील पक्षाच्या गटबाजीत मी नाही, त्यामुळेच या पदावर माझी नियुक्ती झाली. सत्ताधारी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपण प्रश्नांचा पाठपुरावा करू, त्या माध्यमातून सरकारची व पक्षाची प्रतिमा उजळ करण्यासाठी प्रयत्न करू. सर्वाशी चर्चा करून लवकरच कार्यकारिणीही जाहीर करू.
प्रा. बेरड मूळचे नगर तालुक्यातील दरेवाडी येथील आहेत. सध्या ते पक्षाचे जिल्हा सरचिटणीस होते. शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष तसेच भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी परिवारातील संस्थांवर काम केले आहे.

Prime Minister Narendra Modis meeting in Baramati Lok Sabha Constituency
‘बारामती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा?
Jalgaon district president of Ajit Pawar group sanjay pawar criticizes Eknath Khadses surrender to avoid imprisonment
एकनाथ खडसेंची शरणागती तुरुंगवारी टाळण्यासाठीच, अजित पवार गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षांची टीका
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट