पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केलेले सय्यद मकबूल आणि इम्राम खान यांनी दिलसुखनगर, बेगम बाजार या भागाची पाहणी केल्याची माहिती दिल्ली पोलिसांना दिली होती. गुरूवारी रात्री दिलसुखनगर भागात बॉम्बस्फोट झाले आहेत.
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एक ऑगस्ट रोजी कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने असद खान, इम्रान खान, सय्यज फिरोज, लांडगे इफरान मुस्ताफा यांना अटक केली होती. यांच्याकडे केलेल्या तपासानंतर सय्यज मकबूल (रा. धर्माबाद, नांदेड) याला २६ ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथून अटक केली होती.
दिल्ली पोलिसांच्या विशेष पोलीस पथकाचे आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले, ‘‘पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी अटक केल्यानंतर सय्यद मकबूल व इम्राम खान यांच्याकडे चौकशी केली होती. त्यामध्ये त्यांनी रियाज भटकळ याने हैदराबाद मधील काही ठिकाणांची टेहळणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सांगितले होते. त्यांनी पुणे बॉम्बस्फोटाच्या पंधरा दिवस अगोदर मोटारसायकलवरून या ठिकाणांची टेहळणी केली होती.’’
दिल्ली पोलिसांनी मकबूल व इम्रान यांना अटक केल्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी काढलेल्या प्रेसनोटमध्येही दिलसुखनगर, बेगम बाजार आणि अबीस् या भागाची मोटारसायकलवरून पाहाणी केल्याची माहिती दिली होती. मकबूल व इम्रान हे नांदेड जिल्ह्य़ातील असून त्यांचे हैदराबादला नेहमी जाणे-येणे सुरू होते.