दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुढच्या आठवड्यात मराठवाड्यात येणार आहेत. या दौऱयाची तारीख अद्याप निश्चित झालेली नसली, तरी पुढील आठवड्यातच ते या दौऱयावर येणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेत्यांनी दिली.
मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी स्थिती आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. या भागातील धरणांमधील पाणीसाठाही दहा टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही प्रश्न निर्माण झाला आहे. लातूर जिल्ह्याला पाणी पुरविण्यासाठी सोलापूरमधून रेल्वेने पाणी आणण्याची नियोजन राज्य सरकारने केले आहे. त्याचबरोबर लातूर, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील पशुधन वाचविण्यासाठी राज्य सरकारने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मराठवाड्याचा दौऱा करणार आहेत. ते कोणकोणत्या जिल्ह्यांना भेटी देणार हे अद्याप समजलेले नाही. मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी यापूर्वीही राहुल गांधी यांनी मराठवाड्याचा दौरा केला होता.