महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सध्या पावसाला पोषक असलेली हवामान प्रणाली कमकुवत झाल्यामुळे पुढील काही दिवस पावसाचा जोर ओसरणार आहे.  कोकणासह राज्यात तुरळक ठिकाणीत हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन ते तीन आठवडे राज्यात कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होऊन जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत राज्यात धुवाधार पावसाने हजेरी लावली होती. याच कालावधीत मध्य भारतातही मोठय़ा प्रमाणावर पाऊस झाला. राज्यात कोल्हापूर, सांगलीसह नाशिक, महाबळेश्वर आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीने गंभीर स्थिती निर्माण झाली होती.

दोन आठवडे जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ांचे अस्तित्व आता अल्पकाळ राहणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होत जाणार आहे.  काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये कोकणासह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बहुतांश ठिकाणी दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागल्याने तापमानात वाढ झाली आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी सरकत आहे. त्यामुळे ओडिसा, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातील तुरळक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे.