वेळेचे फसलेले नियोजन, वेळेआधीच पार पडलेली सभा, त्यातच ‘मला गळ्याच्या इन्फेक्शनमुळे बोलताना त्रास होत आहे. जास्त वेळ बोलणार नाही,’ असे म्हणत जेमतेम ११ मिनिटांत आटोपलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण, सभेची वेळ नक्की कितीची तेच ठाऊक नसल्याने सभेनंतरही लोंढय़ाप्रमाणे लोटणारी गर्दी आणि सभा आधीच झाल्याचे समजल्याने त्यांची झालेली निराशा..
मोदींच्या सभेचे हे चित्र हिंगोलीकरांसह मराठवाडा-विदर्भवासीयांनी अनुभवले.  
येथील एनटीसी मदानावर शुक्रवारी या सभेचे आयोजन केले होते. परंतु सभेच्या वेळेबाबत कोठेही एकवाक्यता नव्हती. दुपारी १२, २, २.४५ अशा वेळा जाहीर केल्या गेल्या. मोदी पावणेदोनला व्यासपीठावर आले आणि ठीक २ वाजता भाषण आटोपून रवानाही झाले. मात्र, मोदींचे हेलिकॉप्टर उडाल्यानंतरही ठिकठिकाणांहून लोकांना घेऊन वाहने येतच होती. यवतमाळ, वाशिम, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांतून मोठय़ा प्रमाणात लोटलेल्या अनेकांचा मोदींचे भाषण ऐकण्याची संधी हुकल्याने हिरमोड झाला. सभेसाठी शहराच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे प्रथमच वाहतुकीची कोंडी झाली नाही.
भाषणात मोदींनी गेली १५ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला १५ ऑक्टोबरला मृत्युदंड देण्याचे आवाहन केले. आपला जन्म गरीब कुटुंबात झाला. अन्यायाची झळ मला पोहोचली. त्यामुळे गरिबांच्या वेदनांची जाणीव मला आहे, असे सांगून सामान्यांवरील अन्याय दूर करण्यास प्रयत्न करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत देण्याचे आवाहन त्यांनी केले.
राज्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या होऊ नयेत, या साठी राज्य सरकारने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. मोठय़ा प्रमाणात बंधारे बांधल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यात पाणी नसल्याने सिंचन झालेच नाही, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्याला पाणी मिळाले नाही, तर ते जमिनीतून सोने कसे काय पिकवणार, असा सवालही त्यांनी केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचा चोर-पोलिसांचा खेळ सुरू आहे. कालपर्यंत सत्तेत सहभागी असलेले हे पक्ष आज एकमेकांना शिव्या घालत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लोकांनी विश्वास तरी कसा ठेवायचा, असा प्रश्नही मोदींनी केला. केंद्राच्या विचारांचे सरकार राज्यात यावे, या साठी भाजपला बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी खासदार सुभाष वानखेडे यांचेही भाषण झाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.