मंदिरात आईसमवेत आरती करण्यासाठी गेलेल्या आठवर्षीय मुलीस ज्युसचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या नराधमास क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री पदमपुरा भागात हा प्रकार घडला. या नराधमास ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पदमपुरा भागात राहणारी मजूर महिला रात्री आठच्या सुमारास घराजवळच असलेल्या मंदिरात आरती करण्यास गेली होती. या वेळी तिची आठ वर्षांची मुलगी तिच्यासमवेत होती. आरती सुरू असताना पदमपुऱ्यातील धीरेंद्र राजेंद्र मलिक (वय ३५, मूळ ओरिसा) याने या महिलेचे लक्ष नसल्याचे पाहून मुलीस जवळ बोलावले व ज्यूस पाजण्याचे आमिष दाखवून मंदिरासमोरच मंगल कार्यालयाजवळील मोकळ्या मैदानावर नेले व अत्याचार केला. आरती संपल्यानंतर आईने मुलीचा शोध घेतला असता ती रडत असल्याचे तिला दिसून आले. विचारणा केल्यानंतर तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. या मुलीच्या आईने तडक क्रांती चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून नराधम धीरेंद्र याच्या मुसक्या आवळल्या. तो विवाहित असून त्याला एक मुलगा व मुलगी आहे.