कोकणवासीयांचेच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा नवीन खासदार कोण? याचे उत्तर उद्या सकाळी सुरू होणाऱ्या मतमोजणीनंतर अवघ्या पाच तासांतच मिळणार आहे. काँग्रेस आघाडी तसेच शिवसेना महायुतीकडून आपलाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत असून विजयोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
दरम्यान, येथील औद्योगिक वसाहतीमधील भारतीय अन्न महामंडळाच्या प्रशस्त गोदामात शुक्रवारी सकाळी ८.०० वा. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात होणार असून अवघ्या पाच तासांत दुपारी १ वा.पर्यंत मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यात येईल. मतमोजणी दरम्यान तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.
या मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे विद्यमान खासदार डॉ. नीलेश राणे, शिवसेना महायुतीचे विनायक राऊत, बसपाचे राजेंद्र आयरे, आपचे अभिजीत हेगशेटय़े, सोशालिस्ट पार्टीचे अ‍ॅड. दीपक नेवगी यांच्यासह दहा उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. मात्र आघाडीचे डॉ. राणे व महायुतीचे राऊत या दोन तुल्यबळ प्रतिस्पध्र्यामध्येच चुरशीची लढत झाली आहे. प्रचारादरम्यान आम्ही काय केले व यापुढे काय करणार आहोत, तसेच कोकणातील गौण खनिज उत्खनन, मासेमारी बंदरांमधील भेडसावणारी गाळ समस्या, केंद्र व राज्य सरकारकडून कोकणाला दिली जाणारी सापत्न वागणूक आदी असंख्य प्रश्न आ वासून उभे असतानाही याबाबत अवाक्षरही न काढता केवळ वैयक्तिक टीकेवरच भर देण्याचा प्रयत्न आघाडी व युतीच्या उमेदवारांकडून झाला. आता ‘त्या’ टीकेचा व आरोपांचा या मतदारसंघातील लाखो मतदारांनी कसा स्वीकार केला याचा फैसला उद्या (१६ मे) जाहीर होणार आहे.
या मतदारसंघातील एकूण १३,६३,९५७ पैकी ८,९६,२६४ मतदारांनी (६५.७१ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. या लोकसभा मतदारसंघात चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी हे सहा विधानसभा मतदारसंघ असून १९०३ मतदान केंद्रे आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी १४ याप्रमाणे एकूण ८४ टेबले लावण्यात आली आहेत. मतमोजणीची पहिली फेरी सुमारे एक तासाची तर त्यानंतरच्या २२ फेऱ्या प्रत्येकी २० मिनिटांत संपतील. एकूण २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन खासदार निवडून आल्याचे जाहीर होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मतमोजणीसाठी १५०० कर्मचारी नेमण्यात आले असून या दरम्यान तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व शांततेचा भंग होणार नाही यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व संबंधित उमेदवार व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी केले आहे.