देशातील पहिला डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क नागपुरातील मिहान सेझ प्रकल्पात उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी रिलायन्स कंपनीला २८९ एकर जमीन वाटपाचे पत्र आज, शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका हॉटेलात आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना देण्यात आले आहे.
या प्रकल्पात रिलायन्स ग्रुप ६५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दहा हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. मिहानमधील हा सर्वात मोठा प्रकल्प असून, केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्र खासगी उद्योजकांसाठी खुले केल्यानंतर रिलायन्सने या क्षेत्रात उडी घेतली असून हेलिकॉप्टर निर्मितीचा पहिला प्रकल्प मिहान सेझमध्ये उभारणार आहे. या प्रकल्पात लष्करी आणि नागरी हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्पा पाच वर्षांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मिहानमधील एमआरओ चुकीच्या पद्धतीने हातळण्यात आल्याने बोईंग कंपनीने तो एअर इंडियाकडे सोपविला आहे, परंतु एअर इंडियाला ते चालवणे शक्य नाही. यामुळे एमआरओला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी एमआरओमध्ये एका मोठय़ा खासगी कंपनीचा सहभाग घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.