आपण कसलेला पैलवान आहोत. फड आला की लंगोट बांधून उतरतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाणी पाजणार असल्याची वल्गना कोणी करीत असेल, तर आपण तयार आहोत, अशा शेलक्या शब्दांत पालकमंत्री मधुकर चव्हाण यांनी मित्रपक्षातून होत असलेल्या आरोपांचा समाचार घेतला.
काँग्रेसचे पालकमंत्री चव्हाण यांनी आघाडीचा धर्म न पाळता शिवसेनेच्या उमेदवाराला मदत केल्याची तक्रार राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे काय, या बाबत चव्हाण यांना पत्रकारांनी छेडले. त्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी देशातच लाट होती. त्याला आम्ही काय करणार, असे उत्तर देत आम्ही प्रामाणिकपणे आघाडी धर्म पाळला. आता कोणी खोटारडे आरोप करीत असेल, तर त्याचे तोंड बंद करता येणार नाही. पराभव झाला म्हणून खचून जाणाऱ्यांपकी आपण नाही. यापूर्वी दोन वेळा आपण पराभवाला सामोरे गेलो असल्याचे नमूद केले.
सोशल मीडियावरून राष्ट्रवादीचे काही कार्यकत्रे पालकमंत्र्यांनी आम्हाला हात दाखविला, आता विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना पाणी पाजणार, असा मजकूर प्रसिद्ध करीत आहेत. त्याबाबत चव्हाण यांना विचारणा केली असता, राजकारणात आपले अर्धशतक पूर्ण झाले असल्याचे सांगून पाणी पाजणाऱ्यांनी तयार राहावे. आपणही कसलेले पलवान आहोत. कोणताही फड असो, लंगोट बांधूनच िरगणात उतरतो, असे शेलक्या शब्दांत त्यांनी प्रतिआव्हान दिले.
सोलापूर जिल्ह्यात देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार िशदे यांचा पराभव झाला, म्हणून तेथील पालकमंत्र्यांच्या विरोधात आम्ही तक्रार केली नाही. देशभरातच लाट होती. त्यामुळे अनेक बलाढय़ नेत्यांचे पराभव झाले. लातूरसाठी विलासरावांनी थोडे काम केले होते काय? तेथेही मतदारांनी आम्हाला नाकारले. इंदिरा गांधी यांनाही यापूर्वी असेच नाकारले होते. मात्र, त्यानंतर एक-दोन नव्हे, तर तब्बल ४७२ जागा जिंकून काँग्रेसने पुन्हा सत्ता खेचून आणली होती. त्यामुळे विधानसभेपर्यंत ही हवा विरून जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुळजापूर चेंगराचेंगरी अहवाल गुलदस्त्यातच
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिर प्रवेशद्वारासमोर चेंगराचेंगरी होऊन दोनजणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पालकमंत्री चव्हाण यांनी आठ दिवसांत प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. महिनाभरात अंतिम अहवाल सादर केला जाईल, या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, आठ महिने उलटूनही हा अहवाल अजून गुलदस्त्यातच आहे. मंत्री चव्हाण यांना या बाबत विचारणा केली असता, आणखी महिनाभराने अहवाल पूर्ण होईल. चौकशी करणारे अधिकारी बदलून गेल्यामुळे तो रखडला असेल, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रत्यक्षात ३ महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता, आपण तो पाहिला नसल्याचे सांगत त्यांनीही हात वर केले. मांढरादेवीप्रमाणे तुळजापुरात मोठी दुर्घटना होऊ शकते, असा अहवाल पोलीस यंत्रणेने पूर्वीच जिल्हा प्रशासनाला दिला. त्यानंतरही प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही. परिणामी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ही दुर्घटना घडली होती. त्यानंतरही प्रशासन यातील दोषींवर कारवाई करण्याऐवजी अहवालच दडवून ठेवण्यात धन्यता मानत आहे.