मस्करी करणे एका तरुणाच्या जिवावर बेतले आहे. रिव्हॉल्व्हरची गोळी लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. भूम तालुक्यातील पाटसांगवी गावात शुक्रवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली. दस्तगीर जिलानी पटेल (वय-४०) असे मृत तरुणाचे नाव आहे. बाबा शेख यांच्याकडील परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून गोळी सुटून दस्तगीर जिलानी पटेल याचा मृत्यू झाला.

पुण्यात राहणाऱ्या बाबा शेख यांच्याकडे दस्तगीर काही कामानिमित्त पाटसांगवी गावात आला होता. दस्तगीरच्या घरात बाबा शेख हा त्याच्या इतर मित्रांसमवेत बसला होला. तिथेच त्यांचे जेवणाचे नियोजन करण्यात आले होते. त्यांनी मद्यप्राशन केल्यानंतर सगळे गप्पा मारत बसले होते. या दरम्यान बाबा शेख यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर दस्तगीर  हा न्याहळत होता. त्यांच्या मस्करीही सुरू होती. याचवेळी दस्तगीकडून रिव्हॉल्व्हरचा स्ट्रिगर दबून गोळी सुटली. गोळी दस्तगीरलाच लागली. गोळी लागताच दस्तगीर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने उपचारासाठी बार्शी येथे हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भूमचे पोलिस निरीक्षत रामेश्वर खणाळ, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे यांनी पाटसांगवी गावी पोहोचले. घटनेबाबत माहिती जाणून घेतली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.