पोलिसांनी गस्त घालण्याची स्थानिकांची मागणी

पालघर : पालघर-बोईसर मार्गावर नव्याने उभारण्यात येणाऱ्या जिल्हा मुख्यालयाच्या परिसरात रात्रीच्या अंधाराचा लाभ घेऊन चोरी आणि लूटमारीचे प्रकार वाढले आहेत. या परिसरात पोलिसांची गस्त ठेवण्यात यावी तसेच जिल्हा मुख्यालय बांधकामात असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची माहिती पोलिसांनी जमा ठेवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पालघर-बोईसर मार्गावर नगर परिषद हद्दीलगत जिल्हा मुख्यालय इमारतींचे बांधकाम सुरू आहे. नवनगर परिसरात काही जणांकडून रात्रीच्या वेळेस या मार्गावरून जाणाऱ्या मोटारसायकल आणि सायकलस्वारांची लूटमार करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. ही लूटमार बांधकाम कर्मचाऱ्यांकडून केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी स्थानिकांनी हस्तक्षेप करून ठेकेदारांच्या कंत्राटी कामगारांच्या या वर्तनाबाबत समझोता केल्याची माहिती पुढे आली आहे. ठेकेदाराकडे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांची माहिती पोलिसांनी गोळा करावी, अशी मागणी केली जात आहे. कोळगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असलेल्या या भागात निर्जन रस्त्यावर ग्रामपंचायतीने दिवाबत्ती लावण्याची मागणीही या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात येत आहे.

पालघर-बोईसर मार्गावर घडणाऱ्या चोरी व लूटमारीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी या रस्त्यावरील गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. या परिसरात लूटमार किंवा चोरी करण्याच्या प्रकार घडल्याची तक्रार दाखल झाली नाही. आवश्यकता भासल्यास रात्रीच्या वेळी गस्त ठेवण्यात येईल.       – दशरथ पाटील, प्रभारी पोलीस  अधिकारी, पालघर