25 November 2017

News Flash

स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ‘सहकार भूषण’ पुरस्काराने सन्मानित

कोकणातील सहकार क्षेत्रामध्ये गेली सुमारे तेवीस वष्रे पारदर्शी कारभार करीत स्पृहणीय कामगिरी केलेल्या स्वामी

खास प्रतिनिधी, रत्नागिरी | Updated: December 5, 2012 6:21 AM

कोकणातील सहकार क्षेत्रामध्ये गेली सुमारे तेवीस वष्रे पारदर्शी कारभार करीत स्पृहणीय कामगिरी केलेल्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला राज्य शासनातर्फे ‘सहकार भूषण’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत काल पुण्यात झालेल्या शानदार कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
ज्येष्ठ नेते कै. यशवंतराव चव्हाण आणि कै. वसंतराव नाईक यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षही घोषित करण्यात आले आहे. त्यानिमित्त शासनातर्फे राज्यभर सहकारविषयक विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सहकार वर्षांच्या समारोपानिमित्त या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या संस्थांची ‘सहकार महर्षी’, ‘सहकार भूषण’ आणि ‘सहकारनिष्ठ’ या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला कोकण विभागामध्ये ‘सहकार भूषण’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
राज्यातील सुमारे २८ हजार पतसंस्था, सहकारी संस्थांमधून विशिष्ट निकषांवर निवडक संस्थांची सखोल तपासणी तज्ज्ञ समितीकडून करण्यात आली. ठेवी गोळा करण्याबरोबरच कर्जदार-ग्राहकांना अद्ययावत सेवा-सुविधा, कर्जवसुली, पारदर्शी कारभार इत्यादी बाबी विचारात घेऊन या संस्थांना गुण देण्यात आले. त्यामध्ये कोकण विभागात आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थांनी अव्वल गुण मिळवले. त्यामुळे या दोन्ही संस्थांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
आगामी काळात अधिक व्यापक आर्थिक व्यवहार आणि कालानुरूप धोरणांचा स्वीकार करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. पटवर्धन यांनी यानिमित्ताने बोलताना नमूद केले.

First Published on December 5, 2012 6:21 am

Web Title: sahakar bhushan award to swami swrupanand credit society