फलटणनगरीतील आपला दोन दिवसांचा मुक्काम आटोपून माउलींच्या पालखीने आज सकाळी पंढरपूरच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. ‘हरिनामाचा गजर’ करत पालखी शुक्रवारी सायंकाळी सातारा जिल्ह्य़ातील सीमेवरच्या बरड (ता. फलटण) गावी विसावली.
आज सकाळची आरती झाल्यावर पालखी बरडकडे मार्गस्थ झाली. सकाळी विडणी येथे चहापान झाले. तेथील नीरानदीच्या रामरामोशी पुलावर माउलींच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. नुकत्याच झालेल्या पावसाने नदीचे पात्र भरलेले होते. या पाश्र्वभूमीवर ज्ञानोबांच्या पालखीसोहळ्याने नीरा नदीला प्रदक्षिणा घालत बरडकडे प्रस्थान ठेवले. पालखी दुपारी दोनच्या दरम्यान पिंपरद येथे दुपारच्या विसाव्यासाटी व न्याहरीसाठी थांबली. या वेळी चोहोबाजूंनी माउलींचा गजर सुरू होता. रात्रीच्या मुक्कामासाठी सहा साडेसहाच्या दरम्यान माउलीची पालखी बरड (ता. फलटण) येथे दाखल झाली. बरड येथे आज मुक्काम असून उद्या पालखी सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश करणार आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकास विरोध
दरम्यान गोहत्या बंदी कायद्याची अंमलबजावणी करावी व अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक वारकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मंजूर करू नये. लोणंद, पंढरपूर मार्गाचे रुंदीकरण करावे या व अन्य मागण्या मान्य झाल्याशिवाय संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश करणार नाही, असा इशारा दिंडीकरांच्या बैठकीत देण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश करण्यापूर्वी धर्मपुरी येथे शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे पालखी तळ अपुरे पडत आहेत. या अनुषंगाने शासनाने मुक्कामाच्या जागी किमान ५० एकर जागा आरक्षित करावी. अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक मंजूर करण्यापूर्वी वारकऱ्यांशी चर्चा करण्याची गरज असल्याचे वारकऱ्यांचे मत आहे. पंढरपूरला प्रवेश करतानाच गाडय़ा अडविल्या जातात. याशिवाय अनेक मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश न करता धर्मपुरी येथे ठिय्या आंदोलन करण्याच्या निर्णयावर वारकरी ठाम आहेत.