संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन २०१२-१३मध्ये मराठवाडा विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांचा मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
उस्मानाबाद जिल्हयातील वांगी (तालुका भूम) ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचा संत तुकडोजीमहाराज स्वच्छ ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार, औरंगाबाद तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीला ८ लाख रुपयांचा संत तुकडोजीमहाराज स्वच्छ ग्रामपंचायत द्वितीय पुरस्कार, नांदेडमधील नागठाणा (तालुका उमरी) व िहगोलीमधील कुरुंदवाडी (तालुका वसमत) या ग्रामपंचायतींना तृतीय पुरस्कार विभागून देण्यात आला. या ग्रामपंचायती प्रत्येकी ३ लाख रुपये पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी गावाला पाणी व सांडपाणी व्यवस्थापनाचा वसंतराव नाईक पुरस्कार, कुटुंब कल्याणासाठी परभणी जिल्हयातील पडेगाव (तालुका गंगाखेड) ग्रामपंचायतीला आबासाहेब खेडकर पुरस्कार, लातूर जिल्हयातील दवणगाव (तालुका रेणापूर) ग्रामपंचायतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक एकता पुरस्कार देण्यात आला. हे तिन्ही पुरस्कार प्रत्येकी ३० हजार रुपये रकमेचे आहेत. बीड जिल्ह्य़ातील सनगाव (तालुका अंबाजोगाई) येथील जि. प. शाळा सानेगुरुजी स्वच्छ प्राथमिक शाळा स्पध्रेत प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली. मात्र, या शाळेने २००९-१०मध्येही हा पुरस्कार प्राप्त केल्यामुळे २०१२-१३साठी या पुरस्काराची एक लाख रुपये रक्कम लातूर जिल्हयातील धामनगाव (तालुका शिरूर अनंतपाळ) येथील जि. प. प्राथमिक शाळेला देण्यात आली.  परभणी जिल्हयातील पडेगाव (तालुका गंगाखेड) येथील अंगणवाडीला स्वच्छ अंगणवाडी स्पध्रेतील ५० हजार रुपयांचा सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात आला.
विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, संबंधित कर्मचारी व गावकऱ्यांना प्रमाणपत्र व पुरस्कारांचे धनादेश प्रदान केले. पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींच्या वतीने आदिनाथ पालखे व शंकर उबाळे यांनी मनोगत व्यक्त केले.