नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून एका सुरक्षा रक्षकाने बँकेच्या रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या जीपवर गोळीबार केला. उस्मानाबादमध्ये गुरूवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर घडली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

कोल्हापूर येथील युनिर्व्हसल पर्सनल सिक्युरिटीची जीप  महाराष्ट्र ग्रामीण बँकेने रक्कम वाहतूक करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतली आहे़ या जीपवर सुरक्षा रक्षक म्हणून बाजीराव सुभाष कदम व रामेश्वर भोसले (दोघे रा़उस्मानाबाद) काम करतात़ १५ मे रोजी कंपनीचे पर्यवेक्षक उस्मानाबादेत तपासणीसाठी आले होते. तेव्हा सुरक्षा रक्षक बाजीराव कदम गैरहजर होते. शिवाय, त्यांच्या वर्तनाबाबत शंका असल्याने त्यांच्याकडील डबल बोअर गनचा गैरवापर होऊ नये म्हणून मेमो देवून कामावरून कमी करण्यात आले.

दरम्यान, १६ मे रोजी बाजीराव कदम हे बँकेत येऊन कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत निघून गेले. यानंतर १७ मे रोजी सकाळी १०. वा.२० मि. सुमारास बाजीराव कदम पुन्हा गनसह बँकेत आले. बँकेतील ओळखपत्र घेऊन बाहेर आल्यानंतर ‘मला नोकरीवरून कमी केले काय, एक एकाला बघतोच’ असे म्हणत जीपच्या समोरील उजव्या बाजूच्या टायरवर गोळी झाडली.

गनमधील गोळीचा आवाजाने भयभीत झालेल्या परिसरातील व्यवसायिकांनी तेथून पळ काढल्याचे जीपचालक हनुमंत बळीराम रेडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ यावरून बाजीराव कदमविरूद्ध शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व घटनास्थळावरुन निघून गेलेल्या आरोपीस पोलिसांनी तातडीने शोधून काढत अटक केली़ त्याच्या ताब्यातील गनही जप्त करण्यात आली आहे. तपास सहायक उपनिरीक्षक पांडुरंग माने करीत आहेत़