बदलीसाठी बनावट अपंग दाखले तयार करण्याची वेळ शिक्षकावर का आली, याचा विचार सरकारने करण्याची गरज असून बदल्यांची सुधारित नियमावली केली पाहिजे. तसेच अन्यायकारक धोरणामुळे घडलेल्या या प्रकरणात फारसा गंभीर दोष नसल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करू नये, मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांना कमी शिक्षा करून पूर्ववत कामावर घ्यावे अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.
दोन वर्षांपूर्वी बदली टाळण्यासाठी जिल्ह्यातील ७६ प्राथमिक शिक्षकांनी बनावट अपंग दाखले तयार करून ते जिल्हा परिषदेला सादर केले होते. या प्रकरणी चौकशी होऊन शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आता शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती, सेवेतून बडतर्फी अशा कठोर उपाययोजनेचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावासंबंधी खासदार वाकचौरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
खासदार वाकचौरे म्हणाले, राज्य सरकारचे बदलीचे धोरण सदोष आहे. त्यामुळे बदल्यांबद्दल शिक्षकांच्या मनात नेहमी भीतीचे वातावरण असते. बदलीमुळे आपल्याला सेवाकाळ पूर्ण करता येणार नाही अशा भीतीने त्यांना ग्रासलेले आहे. जर बदलीचे धोरण हे सर्वमान्य असते तर शिक्षकांकडून चुका झाल्याच नसत्या. अनवधानाने व सहजगत्या शिक्षकांकडून गंभीर चूक घडली, पण आता मानवतेच्या भूमिकेतून त्यांना क्षमाक्षित केले पाहिजे. यापूर्वी प्रशासनाने अशी माफी अनेकदा दिलेली आहे. शिक्षकांचा अध्यापनात दोष असेल तर त्यांना जरूर शिक्षा करावी. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाई करावी, पण अध्यापनात दोष नसल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारू नये असेही ते म्हणाले.
जिल्हा परिषदेचे कर्मचारी व शिक्षक यांच्या बदल्या सोयीनुसार करण्यात याव्या. तरच ते पूर्ण कार्यक्षमतेने काम करू शकतील. बदल्यांचे धोरण हे खुली चर्चा करून घेतले जावे. ते घेताना लोकप्रतिनिधी, कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना यांना विश्वासात घ्यावे, शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्याही सूचनेचा विचार केला जावा, शिक्षक बदली प्रक्रिया करताना शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल याचा विचार करावा. असेही खासदार वाकचौरे म्हणाले.
अपंग दाखल्याप्रकरणी शिक्षकावर कठोर कारवाई करू नये, कमीतकमी शिक्षा द्यावी, त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेणार आहोत. जिल्हा परिषदेनेही या प्रश्नाकडे मानवतावादी भूमिकेतून पाहावे असेही खासदार वाकचौरे यांनी सांगितले.