केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी खासदार अंकुशराव टोपे आणि माजी खासदार पुंडलिकराव दानवे या जिल्ह्य़ातील तीन ज्येष्ठ नेत्यांचा सध्या विधानसभा निवडणुकीत मुलांच्या विजयासाठी संघर्ष सुरू आहे.
रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष भोकरदनमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत. मागील निवडणुकीत रावसाहेब दानवे यांच्या पत्नी या मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. त्यानंतर गेली चार-पाच वर्षे या मतदारसंघात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संतोष दानवे यांना जनतेसमोर ठेवण्यात आले आहे. रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आदी पदांवरही ते आहेत. या मतदारसंघात सलग ३ वेळेस राष्ट्रवादीकडून निवडून आलेले चंद्रकांत दानवे यांच्याशी संतोष दानवे यांची लढत आहे. शिवसेनेने भाजपचेच जुने कार्यकर्ते रमेश गव्हाड यांना उमेदवारी दिल्याने संतोष दानवे यांच्यासमोर डोकेदुखी वाढली आहे. ग्रामपंचायत सदस्य ते दोन वेळेस विधानसभा सदस्य आणि चार वेळेस लोकसभेवर निवडून येऊन आता केंद्रात राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे हे अनुभवी आणि निवडणुकीच्या खेळातील तरबेज पुढारी आहेत. त्यामुळे रमेश गव्हाड यांच्या उमेदवारीने आपल्या मुलाचा पराभव होऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. लोकसभा निवडणूकजिंकली, तरी विधानसभेत आपल्या पक्षाचा उमेदवार पराभूत होण्याचा अनुभव त्यांनी मागील ३ वेळेस घेतला आहे. त्यामुळे ते या वेळेस अधिक जागरूक आहेत.
भोकरदनमधून राष्ट्रवादीकडून सलग ३ वेळेस निवडून येणारे राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांचे वडील पुंडलिकराव दानवे माजी खासदार आहेत. पुंडलिकराव मूळ भाजपचे, परंतु २००३ मध्ये भोकरदन विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र चंद्रकांत राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. पुंडलिकराव दानवेंनी सलग ५ वेळा भाजपकडून निवडणूक लढवली. यातील दोन वेळेस ते निवडून आले. पुंडलिकराव म्हणजे भाजप असेच समीकरण जवळपास दोन दशके जिल्ह्य़ात होते. परंतु विधानसभेच्या मागील ३ निवडणुकात राष्ट्रवादीत गेलेले आपले पुत्र चंद्रकांत यांच्या पाठीशी ते आहेत. केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांचे राजकारण जवळून ओळखणारे पुंडलिकराव आता पुत्र चंद्रकांत यांच्या प्रचारात आहेत.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांची पुत्र राजेश यांच्या प्रचारयंत्रणेत महत्त्वाची भूमिका आहे. सलग ३ वेळेस निवडून येणारे व १४-१५ वर्षे मंत्री असणारे राजेश टोपे चौथ्यांदा घनसावंगीतून निवडणूक लढवत आहेत. सहकार, शिक्षण व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात कायम महत्त्वाची भूमिका बजावणारे अंकुशराव पुत्र राजेशच्या प्रचारात हिरीरिने सहभागी आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डावपेच व प्रचाराच्या पद्धतीवर लक्ष ठेवून त्यांनी राजेश विजयी कसे होतील, यावर लक्ष केंद्रित केले आहे. मागील ६ महिन्यांपासूनच निवडणुकीसंदर्भाने त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला. १९८५ नंतर सलग १० वर्षे आमदार असताना काँग्रेसअंतर्गत राजकारणात अंकुशरावांविरोधात सक्रिय राहिलेले विलासराव खरात भाजपकडून उभे आहेत. त्यामुळे अंकुशराव टोपे यांचे प्रचाराचे काम अधिक वाढले आहे.