दिवंगत ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके यांच्या कन्या प्राचार्या लीलाताई पाटील यांचे सोमवारी रात्री ८.५० वाजता निधन झाले, त्या ९२ वर्षांच्या होत्या. कोल्हापूरातील पल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री १० वाजता त्यांच्या राहत्या घरुन अंत्ययात्रा निघणार आहे. एक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांचा विवाह कोल्हापूरातील बापूसाहेब पाटील यांच्याशी झाला होता. पाटील यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले तर त्यांचा मुलगा अपघाती मृत्यू पावला.

येथील ‘आंतरभारती’च्या साहाय्याने शिक्षणास सर्जनात्मक व आनंददायी बनवण्यासाठी ‘सृजन आनंद विद्यालय’ नावाची इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण (केवळ औपचारिक नव्हे) देणारी एक शाळा त्यांनी सुरू केली.

सृजन आनंद शिक्षण केंद्र, कोल्हापूर सन १९८५ पासून कार्यरत आहे. या संस्थेमार्फत ‘सृजन आनंद विद्यालय’ ही प्रायोगिक शाळा चालविली जाते. लीलाताई पाटील या प्रयोगाच्या अध्वर्यु, त्या बी. एड. कॉलेजच्या प्राचार्य होत्या. २८ वर्षांच्या शासकीय, अध्यापक महाविद्यालयातील अध्यापनाच्या कार्यातून सुटका झाल्यावर त्यांनी प्रयोगशील शिक्षणाचा प्रयत्न सुरू केला. बंदिस्त शिक्षणास भेद देऊन स्वतंत्र विचाराचा विद्यार्थी घडवण्याचा ध्यास घेऊन सृजन आनंद शिक्षण केंद्राची सुरुवात झाली. प्रथम केंद्र सुरू झालं. मग त्यांना औपचारिक मान्यता देण्याच्या दृष्टीनं विद्यालय सुरू झाले.

लीलाताईंची पुस्तके ही शिक्षक माणूस घडवणारे उत्तम माध्यम आहे. विशेषत: मराठी अध्यापन हा लीलाताईंचा जीव की प्राण होता. त्यात त्यांनी अनेक प्रयोग करून पाहिले. ‘सृआवि’त अशा प्रायोगांना लिखित रूप देण्यात आले आहे.