सोळाव्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतीच्या दहाही जागांवरील दणदणीत विजयाने स्वतंत्र विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच ‘योग्य वेळ येऊ द्या’ या नितीन गडकरींच्या सूचक वक्तव्याने त्यास बळकटीच मिळाली असून या वर्षांच्या अखेरीस विदर्भासंबंधीच्या हालचाली होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
लहान राज्यांमुळे प्रशासन सुयोग्य चालते, असे भाजपचे स्पष्ट मत असून छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड आदी लहान राज्ये झाली तेव्हा भाजपने विरोध न करता पाठिंबाच दिला होता. तेलंगणाच्या मागणीस भाजपचा पाठिंबाच होता. मात्र, ज्या पद्धतीने काँग्रेसने श्रेय लाटण्यासाठी हा प्रकार केला त्या पद्धतीस भाजपने तीव्र नापसंती व्यक्त केली. ‘स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे’, असा ठराव भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत याआधीच संमत झाला आहे. सर्वसंमतीने स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव विधिमंडळात संमत होऊन तो केंद्र शासनाकडे पाठविला जावा, असे भाजपला वाटते. तसे भाजपचे नेते वेळोवेळी स्पष्ट करीत आले आहेत. या मागणीसाठी भाजपच्या झोळीत भरभरून मते द्या, भाजपचे राज्य येऊ द्या, असे अनेकदा भाजपच्या नेत्यांनी वक्तव्य केले आहे.
विदर्भ स्वतंत्र झाल्यासच विकास होईल, अशी विदर्भवाद्यांची धारणा आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा मात्र स्वतंत्र विदर्भ राज्याला विरोध आहे. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा होऊ नये. मात्र, विदर्भाचा विकास झाला पाहिजे, असे शिवसेनेला वाटते. स्वबळावर भाजपला कधीच सत्ता मिळवता न आल्याने युती करून वाटचाल करताना मित्रपक्षाच्या भावनेला तडा जाऊ नये, या उद्देशाने भाजपने विदर्भाचा मुद्दा बाजूला ठेवल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. आता मात्र, राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त जागा दिल्या. सत्ता स्थापनेसाठी भाजपला आता कुणाही पक्षाच्या दारात उभे राहायची गरजच राहिलेली नाही.
भाजप जनतेच्या हिताचे निर्णय संख्याबळाच्या भरवशावर घेऊ शकतो. त्यामुळेच स्वतंत्र विदर्भवाद्यांच्या आशांना पालवी फुटली आहे.
व्यक्तिश: स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असलेले नितीन गडकरी यांचे केंद्र स्तरावर वजन वाढले असून पक्षाच्या सांसदीय मंडळात ते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी मांडलेल्या मतास विरोध करण्याची िहमत भाजपचे नेते करणार नाहीत, असेही वैदर्भीयांना वाटते. या पाश्र्वभूमीवर निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या स्वतंत्र विदर्भाविषयीच्या प्रश्नावर नितीन गडकरी व भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ‘योग्य वेळ येऊ द्या’ असे केलेले व्यक्तव्य सूचक ठरते. या वक्तव्याने स्वतंत्र विदर्भाच्या मागणीस बळकटी मिळाली आहे. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या मागणीसंदर्भात विचारही होणार नाही. विधानसभेत सत्ता आल्यानंतर काही महिन्यांनी स्वतंत्र विदर्भासंदर्भात हालचाली होऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.