उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

बीड : मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असली तरी दुष्काळ जाहीर होईल तेव्हा आभार मानू. पावसाअभावी पिके करपली तरी सरकारकडून उपग्रहाद्वारे नकाशाधारे मोजणी करू, पिकांच्या आणेवारीचा अहवाल मागू, चर्चा करू, त्यानंतर दुष्काळ जाहीर करू असे सांगितले जात असून मुख्यमंत्र्यांना दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचांगाची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. शिवसनिकांनी गावागावांत जाऊन सरकारी योजनांचा किती लोकांना फायदा झाला याचे फलक लावून जाहिरातबाजी करणाऱ्या भाजपला उघडे पाडावे, असे आवाहन केले. पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा दावाही त्यांनी केला.

बीड तालुक्यातील तळेगाव येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून बीडमध्ये आयोजित शिवसेना गटप्रमुख, लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, मंत्री अर्जुन खोतकर, संपदा गडकरी, राज्य संघटक गोिवद घोळवे, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळुक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीला येऊन दुष्काळी परिस्थितीत राज्याला भरपूर मदत करू, असे सांगून गेले. पण ही भरपूर मदत लोकापर्यंत पोहोचणार आहे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भाजपने निवडणुकीत दिलेली आश्वासने ही निवडणूक ‘जुमला’ असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर सांगितले. याचा उल्लेख करून राम मंदिर वही बनायेंगे, समान नागरी कायदा याही घोषणा जुमला होत्या, असे जाहीर करावे. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत सरकारने तत्काळ निर्णय घेतला. तसा राम मंदिराबाबत का नाही. कायदा करून मंदिर उभारा अशी मागणी त्यांनी केली. कर्जमाफीचा पसा गेला कुठे, असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

बीडमध्ये शिवसेना ताकदीने लढणार

बीड जिल्ह्यात आल्यावर दिवंगत गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांची आठवण येते. बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडेंसाठी एकेक करून सर्व जागा भाजपल्या दिल्या. केवळ एकच मतदारसंघ सेनेकडे राहिला. मात्र आता आगामी निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी बीडमधून किती आमदार देणार, असा सवालच त्यांनी विचारला. शिवसनिकांनी गाव तिथे शाखा स्थापन करून फलक लावा, संघटन मजबूत करा आणि आगामी निवडणुकीत ताकदीने लढा, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.